PM Modi is our leader, says nitin gadkari | Sarkarnama

गडकरी म्हणाले, `पंतप्रधान मोदी हे आमचे नेते' 

उमेश घोंगडे
रविवार, 23 डिसेंबर 2018

नेतृत्वाच्या अपयशाबाबत मी जे काही बोललो होतो ते नागरी बॅंकांच्या संदर्भात होते. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. माध्यमांनी विपर्यास करून बातम्या दिल्या आहेत, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपली बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न आज केला. 

पुणे : नेतृत्वाच्या अपयशाबाबत मी जे काही बोललो होतो ते नागरी बॅंकांच्या संदर्भात होते. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. माध्यमांनी विपर्यास करून बातम्या दिल्या आहेत, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपली बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न आज केला. 

"मी कोणत्याही शर्यतीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे नेते आहेत. निवडणुकीनंतर तेच देशाचे पंतप्रधान होतील,'' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कोणत्याही क्षेत्रात यशाचे श्रेय घेणारे अनेकजण असतात. मात्र अपयश अनाथ असते. त्यामुळे अपयशाचे श्रेयदेखील नेतृत्वाने स्वीकारालयला हवे, असे मत नागरी बॅंक असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले होते.

नुकत्याच झालेल्या तीन राज्यातील निवडणुकांत भारतीय जनता पार्टीच्या अपयशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने गडकरी यांच्या वक्तव्याचा रोख दाखविणाऱ्या बातम्या आज सर्व माध्यमातून आल्या. त्यामुळे गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. 

गडकरी म्हणाले, "मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसात सातत्याने होत आहे. त्यामुळे बोलणे कठीण झाले आहे. कुणी काहीही म्हटले तरी पंतप्रधान मोदी हेच आमचे नेते आहेत. मी कोणत्याही शर्यतीत नाही. आगामी निवडणुकादेखील पंतप्रधान मोदी यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष लढवणार असून निवडणुकीनंतर मोदी हेच पंतप्रधान होतील.''
 

संबंधित लेख