फुटकळ आरोपाने  पिंपरीत भाजप सैरभैर 

फुटकळ आरोपाने  पिंपरीत भाजप सैरभैर 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय लढाईत जरी सत्ता आणि संख्याबळ भाजपाचे असले तरी राष्ट्रवादीच वरचढ दिसली. सामसूम झाली असे वाटत असतानाच पुढच्या पाच वर्षांत पालिकेचे राजकारण कसे चालणार त्याची एक झलक मिळाली. सोहळ्यातील भाजपची मंडळी ताडपत्रीच्या गैरव्यवहाराच्या एका फुटकळ आरोपाने पार सैरभैर झाली. सत्तेच्या सिंहासनाला किती काटे आहेत ते त्यांना प्रथम उमगले. "चार दिवस सुनेचे, चार दिवस सासूचे' हा खेळ लोक पहात आहेत. 

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता नामधारी, प्रशासनावर वर्चस्व राष्ट्रवादीचेच पिंपरी चिंचवड महापालिकेत तीन महिन्यांपूर्वी अनपेक्षितपणे सत्तांतर झाले. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावरही राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच वर्चस्व होते. अगदी गेल्या पंचवीस वर्षांचा मागोवा घेतला तर या पंचक्रोशीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. भाजपचे कुसळसुद्धा या मातीत रुजत नव्हते. दोन-तीन वर्षांपूर्वी देशात आणि राज्यात हवा पालटली. तेच वावटळ घोंघावत घोंघावत येथपर्यंत पोचले. अशाही परिस्थितीत "दादाला सत्तेवरून खेचणारा अजून जन्माला यायचा' इतका दांडगा आत्मविश्‍वास आपल्या सत्तेबाबत अजित पवारांना होता. रात्रीतून दादांच्या पायाखालची सतरंजी गेली आणि इथल्याही राजकारणाने कूस बदलली. 

भाजपच्या बेडकीचा पाहता पाहता बैल झाला. सत्तेच्या मस्तीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची झूल जनतेनेच उतरवली. भाजप बहुमतात आला आणि स्वप्नातसुद्धा नसताना राष्ट्रवादी थेट विरोधात बसली. अवघ्या तीन वर्षांत एक खासदार, दोन आमदार, 128 पैकी 78 नगरसेवक, आजी-माजी नेत्यांची उधार उसनवारी करून भाजपने सर्कस करत फौजफाटा उभा केला. केंद्र-राज्य पाठीशी असल्याने हत्तीचे बळ आले. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिल्लक सरदार, भालदार, चोपदार एकदमच गारद झाले. राष्ट्रवादीचे नामोनिशाण मिटल्याचे चित्र होते. दोनच दिवसांपूर्वी महापालिका अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सभागृहात भाजपा विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे असे द्वंद्व पहायला मिळाले. चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजूर केल्याने भाजपावर दादागिरीचा आरोप झाला. 

राष्ट्रवादीने उठाव केला, सभात्याग केला. राष्ट्रवादीच्या चार मुरब्बी नगरसेवकांनी भाजपला कसा सत्तेचा कैफ चढला ते मांडले. पालखीच्या निमित्ताने वारकऱ्यांना भेट द्यावयाच्या ताडपत्री खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाने भाजपाची अवस्था अंगावर पालच पडल्यासारखी झाली. राष्ट्रवादीच्या कोठारात दारूगोळा आणि सैन्य कमी असले तरी जशा तोफा धडधडू लागल्या तशी भाजपची गाळण उडाली. कारण भाजपाकडे सीमा सावळे वगळता 90 टक्के नगरसेवक नवखे आहेत. 

त्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मंगला कदम, योगेश बहल, दत्ता साने, राजू मिसाळ, नाना काटे, अजित गव्हाणे यांच्या सारखे एकाचढ एक असे 17 पट्टीचे खिलाडी आहेत. या राजकीय लढाईत जरी सत्ता आणि संख्याबळ भाजपाचे असले तरी राष्ट्रवादीच वरचढ दिसली. सामसूम झाली असे वाटत असतानाच पुढच्या पाच वर्षांत पालिकेचे राजकारण कसे चालणार त्याची एक झलक मिळाली. सोहळ्यातील भाजपची मंडळी गैरव्यवहाराच्या एका फुटकळ आरोपाने पार सैरभैर झाली. सत्तेच्या सिंहासनाला किती काटे आहेत ते त्यांना प्रथम उमगले. "चार दिवस सुनेचे, चार दिवस सासूचे' हा खेळ लोक पहात आहेत,तो असा. 

सत्ता येऊन तीन महिने झाले नाही तोच शहरातील तमाम भाजप नगरसेवकांना नैराश्‍याने ग्रासल्याचे जाणवले. "सर्वत्र आमची सत्ता असूनही काहीच उपयोग नाही, एकही काम होत नाही. महापालिकेतील अधिकारी सोडा हो, साधा लिपिकसुद्धा नगरसेवकाचे ऐकत नाही. लोकांना तोंड दाखवणे मुश्‍कील झाले. आज सत्ता भाजपची पण, प्रशासन पूर्णतः राष्ट्रवादीच्या हातात आहे', ही अत्यंत बोलकी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता असलेल्या एका भाजप नगरसेवकाची. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास नागपूरहून आयुक्त म्हणून श्रावण हर्डिकर यांना आणले आहे. आता त्यांच्यावरच भाजपच्या आशा आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभावाखाली नाहीत पण प्रशासनातला मो भाग अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभावाखाली आहे. महापौर निष्प्रभ, सत्ताधारी नेता सैरभैर, उपमहापौर कोण ? अशी अवस्था. स्थायी समिती अध्यक्षांचा तोराच निराळा. अद्याप प्रभाग रचनाच नाही, निधीचाही थांग पत्ता नाही. कामे कशी आणि कधी होणार, हा सवाल दुसऱ्या एका भाजप नगरसेवकाचा. आजवर जे राष्ट्रवादी कॉंग्रेसला नावे ठेवत ठेवत सत्तेत आले, त्या भाजपचीच आता पुरती "राष्ट्रवादी'झाली. खरे तर, सत्ता प्रशासनाची आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

भाजपचा तो आवाकाच नाही म्हणा की प्रशासन हाकता येत नाही म्हणा. ज्या ज्या अधिकाऱ्यांवर भाजपाने भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप केलेत त्यापैकी एकालाही तीन महिन्यांत भाजप पदच्युत (बाल भी बाका ना कर सके) करू शकत नाही. ही शोकांतिका म्हणावी की मतलबीपणा, त्याचे उत्तर आता काळ देईल तेव्हा देईल पण सर्वसामान्य जनता होत्याचे नव्हते करू शकते हा साधा धडा "भाजपायी' मंडळी ताज्या निवडणुकीवरून शिकू शकत नाही, हे त्यांचे दुर्दैव.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com