pimpri-vandana-chavan-on-child-abuse | Sarkarnama

मानसिक विकृती, पोर्नोग्राफीमुळे लैंगिक अत्याचार : खासदार वंदना चव्हाण 

उत्तम कुटे 
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

वाढते लैंगिक अत्याचार व त्यातही अल्पवयीन मुलीवरील अशा गुन्ह्यांत झालेली लक्षणीय वाढ ही आता सामाजिक समस्या झाल्याने त्यामागील मूळ कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले. 

पिंपरीः वाढते लैंगिक अत्याचार व त्यातही अल्पवयीन मुलीवरील अशा गुन्ह्यांत झालेली लक्षणीय वाढ ही आता सामाजिक समस्या झाल्याने त्यामागील मूळ कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले. 

मानसिक विकृती (लेप्टोमॅनियासदृश मानसिक आजार) आणि पोर्नोग्राफी या दोन मुख्य कारणामुळे बाल लैंगिक अत्याचार वाढले असल्याची कारणमीमांसा त्यांनी केली. त्यामुळे पोर्नोग्राफीवर बंदी वा किमान नियंत्रण असावे, असे उपायवजा मत त्यांनी या उग्र रूप धारण केलेल्या समस्येवर व्यक्त केले. 

पिंपरी-चिंचवडमध्ये काही दिवसांत लैंगिक अत्याचारात मोठी चिंताजनक वाढ झाली आहे. तीन आठवड्यात अशा पाच घटना घडल्या असून त्यात दोन अल्पवयीन मुलींचा बळी गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार चव्हाण यांनी पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची भेट घेऊन हे गुन्हे तातडीने रोखण्याची आयुक्तांकडे मागणी केली. राजाश्रयामुळे गुन्हेगारी बोकाळली असून राजकीय दबावाला बळी न पडता कडक कारवाई असे गुन्हे करणाऱ्या नराधमांविरुद्ध करण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यानंतर त्या "सरकारनामा' प्रतिनिधीशी बोलत होत्या. वकील असलेल्या खासदार चव्हाण या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या समिती सदस्या असून या विषयाचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. 

खासदार चव्हाण म्हणाल्या, ""पोर्नोग्राफी तथा अश्‍लील फिल्म्स सध्या मुलांना सहज उपलब्ध होण्याची (पाहण्याची) सोय मोबाईलमुळे झाली आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचार पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर पुण्यासह राज्य आणि देशातही वाढले आहेत. त्यातून लहान मुली या शाळेतही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. परिणामी या समस्येमागील मूळ कारण शोधून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. 

काहींच्या मानसिक आजारासारख्या विकृतीतून बालिकांवर अत्याचार होत आहेत. अनेक अल्पवयीन मुलेही हे गुन्हे करीत आहेत. त्यांना ते करण्यास पोर्नोग्राफी प्रवृत्त करीत आहे. त्यामुळे चीन या देशाने पोर्नोग्राफीवर बंदी आणली आहे. तशीच ती आपल्याकडे यावी, असे मला वाटते. किमान या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी या अश्‍लील फिल्म्सवर नियंत्रण,तरी हवे''. 
 

संबंधित लेख