pimpri-vandana-chavan | Sarkarnama

राजाश्रयामुळे पिंपरीत गुन्हेगारी बोकाळली; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची `राष्ट्रवादी'ची मागणी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

राजाश्रय मिळत असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी बोकाळली असल्याचा हल्लाबोल शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही शुक्रवारी केला. गृहखाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी आज केली. 

पिंपरीः राजाश्रय मिळत असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी बोकाळली असल्याचा हल्लाबोल शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही शुक्रवारी केला. गृहखाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी आज केली. 

मागील पंधरा दिवसात पिंपरी चिंचवड शहरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या चार घटना घडल्या असून एका पीडित मुलीचा खून करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर कालच शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची भेट घेऊन शहरातील राजकीय गुन्हेगारीचा बीमोड करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज पिंपरी-चिंचवड राष्ट्‍ररवादी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तांची भेट घेतली. मुली व महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी,कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता गुन्हेगारांवर जरब बसवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याने शहरात गुन्हेगारी बोकाळल्याचा आरोप त्यांनीही केला. 

15 ऑगस्टला पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू करण्यात आले आहे. तरीदेखील शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांना अद्यापही नियंत्रण मिळविता आले नाही. उलट गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो आहे,असा आरोप वाकडकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे शहरातील युवती दडपणाखाली आल्या आहेत. यावर अजून फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांनी साधी प्रतिक्रियादेखील दिलेली नाही, अशा संवेदनाहीन मुख्यमंत्र्यांनी शहरातील व राज्यातील महिलांवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.पोलिस, राजकारणी आणि गुंडांचे हितसंबंध असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही. तडीपार गुंडदेखील दिवसाढवळ्या शहरात वावरून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून पीडित कुटुंबीयांना भेटण्यास मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना वेळ नाही ही लाजिरवाणी बाब आहे. 
 

संबंधित लेख