pimpri-ss-bjp-alliance-confusion | Sarkarnama

युतीत गोंधळ, आघाडीत मुजरा; पिंपरीत विरोधभासाची स्थिती 

उत्तम कुटे 
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी निश्‍चित होणार असल्याने पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आताच निर्धास्त झाले आहेत. एवढेच नाही, तर ते निवडणुकीच्या तयारीलाही लागले आहेत. मात्र,युतीचा निर्णय लटकल्याने शिवसेना, भाजपमध्ये चिखलफेक सुरू आहे. 

पिंपरीः काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी निश्‍चित होणार असल्याने पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आताच निर्धास्त झाले आहेत. एवढेच नाही, तर ते निवडणुकीच्या तयारीलाही लागले आहेत. मात्र,युतीचा निर्णय लटकल्याने शिवसेना, भाजपमध्ये चिखलफेक सुरू आहे. 

दरम्यान, युती झाली नाही,तर शहरातील राजकीय समीकरण बदलणार आहे. त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्‍यता आहे. तसेच त्यामुळे शहराचा समावेश असलेल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघात दुरंगीऐवजी तिरंगी लढती होतील. 

आघाडी होणार असल्याने स्पष्ट संकेत परवा दोन्ही कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्याने आघाडीतील दोन्ही पक्षांत सुसंवाद निर्माण होऊ लागला आहे. त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा कायम ठेवला आहे. त्यामुळे युती होईल की नाही, याविषयीचा संभ्रम कायम आहे. परिणामी युतीच्या दोन्ही प्रमुख पक्षांतील विसंवादही कायम आहे. उलट तो वाढत चालला आहे. त्याला शिवसेना खासदार व भाजप आमदारांतील कलगीतुरा दुजोरा देत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी युती झाली,तर तोपर्यंत निर्माण होणारी कटुतेची दूरी भरून काढणे भाजप, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अवघड जाणार आहे. 

आघाडी ही उद्योगनगरीत राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. कारण तेथील लोकसभेचे दोन्ही उमेदवार त्यांचेच असणार आहेत. मात्र, युती झाली नाही,तर त्याचा शिवसेनेला तोटा आणि भाजपला फायदा होण्याची शक्‍यता राजकीय जाणकार वर्तवित आहेत. शहराचा अंतर्भाव असलेल्या लोकसभेच्या दोन्ही जागी (मावळ आणि शिरूर) शिवसेनेचे खासदार आहेत. युती झाली,तर या जागा शिवसेनेकडेच आहेत. त्या ते सोडणार नाहीत. त्यामुळे लोकसभेला भाजपला काहीही फायदा युती झाल्याने उद्योगनगरीत होणार नाही. मात्र, ती झाली नाही,तर भाजपही रिंगणात असेल. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी, भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होईल. सध्याची मावळमधील आमची ताकद पाहता तेथे युती झाली नाही,तर आम्ही नक्की विजयी होऊ, असा दावा शहर भाजपने केला आहे. तर, मोदी लाटेमुळे शिरूरमध्येही विजयी होऊ, असेही त्यांचे म्हणणे आहे.  
 

संबंधित लेख