pimpri-smart-city-tender-NCP-accusation | Sarkarnama

`स्मार्ट सिटीच्या निविदांसाठी "सीएमओ'चा दबाव; पिंपरी-चिंचवड `राष्ट्रवादी'चा सनसनाटी आरोप 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

स्मार्ट सिटी प्रकल्पात पिंपरी-चिंचवडमध्ये विशिष्ट कंपनीलाच काम देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून (सीएमओ)इतर कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज केला. या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. 

पिंपरीः स्मार्ट सिटी प्रकल्पात पिंपरी-चिंचवडमध्ये विशिष्ट कंपनीलाच काम देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून (सीएमओ)इतर कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज केला. या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. 

केलेल्या आरोपांना पुष्टी देणाऱ्या शंका असून त्यांचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निरसन करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी पत्रकारपरिषदेत केली. या शंकांची जंत्रीच त्यांनी सादर केली. 

ठराविक कंपनीला काम मिळावे, अशाच कामाच्या अटी व शर्ती तयार करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नियोजनबद्ध लूट करण्याचा हा डाव असून त्यामुळे "ना भय, ना भ्रष्टाचार' या भाजपच्या घोषणेला त्यामुळे हरताळ फासला गेला आहे, असे ते म्हणाले. याबाबतची रीतसर तक्रार स्मार्ट सिटीची संकल्पना असलेल्या पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर योग्य निर्णय न झाल्यास सनदशीर मार्गाने त्याला विरोध केला जाईल, असा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आमचा विकासकामांना विरोध नसून तो चुकीच्या कामाला व पद्धतीला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

संबंधित लेख