pimpri-shrirang-barne-laxman-jagtap | Sarkarnama

विकासावर बोला म्हणताच खासदार बारणे बिळात लपले; आमदार जगताप यांचा प्रहार 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

वाक्‍पंडित असलेल्या शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे लोकसभेत बोलून बोलून दात वाकडे झाले, तरी मावळ मतदारसंघातील जनतेच्या पदरात काहीच पडले नाही, असा प्रहार भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी केला.

पिंपरीः वाक्‍पंडित असलेल्या शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे लोकसभेत बोलून बोलून दात वाकडे झाले, तरी मावळ मतदारसंघातील जनतेच्या पदरात काहीच पडले नाही, असा प्रहार भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी केला. यानिमित्त या दोघा कट्टर राजकीय शत्रूतील कलगीतुरा सहाव्या दिवशीही सुरूच राहिला आहे. 

जगताप हे मौनी आमदार असल्याची टीका बारणे यांनी केली होती.त्याचा समाचार जगताप यांनी घेतला.""मला मौनी आमदार म्हणणाऱ्या बारणे यांनी विधानसभेचा सभावृत्तांत पहावा, ज्या ज्या वेळी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केले,त्या प्रत्येकवेळी पिंपरी-चिंचवडकरांच्या पदरात काही ना काही पडले आहे'', असे टोला जगताप यांनी बारणेंना आज लगावला. ते म्हणाले, मी किंवा माझ्या कुटुंबीयांनी एकाचीही जागा ढापली असेल, तर ते पुराव्यासह जनतेसमोर आणावे. अन्यथा तुम्ही व तुमच्या बगलबच्च्यांनी प्राधिकरणाच्या ढापलेल्या जागा परत कराव्यात. मी शहर बकाल केले असेल, तर नेमके काय केले हेही जनतेला सांगावे. तसेच अतिक्रमण कारवाईला कोठून सुरवात करावी, हेही बारणे यांनीच सांगावे. त्यानुसारच कारवाई केली जाईल. विकासावर बोला असे मी आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद न देता बिळात जाऊन लपले आहेत.महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास हा मी विधानसभेत शहराचे प्रश्न मांडून ते सोडवल्याचा पुरावाच आहे. सभागृहांमध्ये लोकांचे प्रश्न मांडून दिखाव्यासाठी बोंबलणे सोपे असते. प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी धमक असावी लागते. 

""माझ्या फ्लेक्‍सवर कोणत्या गुंडांचे फोटो लावलेले असतात हेही बारणेंनी सांगावे. माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार करावी. खासदार बारणे हे पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती होण्यापूर्वी दहा बाय दहाच्या खोलीत राहात होते. नंतर त्यांनी थेरगावात आलिशान बंगला कसा बांधला आणि त्यांचा व्यवसाय काय? हे जनतेला त्यांनी सांगावे.माझ्याकडे वडिलोपार्जित पन्नास एकर जमीन आहे. त्यामुळे मला कोणाचीही जागा ढापण्याची गरज पडली नाही. नुसते फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्यातून वेळ मिळाला, तर खासदार बारणे यांनी संपूर्ण शहराचा एक फेरफटका मारावा. उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीप्रमाणे ऊठसूट माझ्यावर बेछूट आरोप करणाऱ्या खासदार बारणे यांना विकासावर बोलण्याचे मी आवाहन केले होते.'' 
 

संबंधित लेख