pimpri-shrirang-barne-laxman-jagtap | Sarkarnama

पोलिसांत तक्रार देण्याचे आमदार जगतापांचे खासदार बारणेंना आव्हान

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

माझ्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढल्याचे फोटोवाला खासदार श्रीरंग बारणे या महाशयांना वाटत असेल, तर त्यांनी माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करून दूध का दूध पाणी का पाणी करावे, असे खुले आव्हान भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना आज दिले. यानिमित्त या दोघा कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांतील कलगीतुरा चौथ्या दिवशीही सुरुच राहिला आहे.

पिंपरीः माझ्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढल्याचे फोटोवाला खासदार श्रीरंग बारणे या महाशयांना वाटत असेल, तर त्यांनी माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करून दूध का दूध पाणी का पाणी करावे, असे खुले आव्हान भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना आज दिले. यानिमित्त या दोघा कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांतील कलगीतुरा चौथ्या दिवशीही सुरुच राहिला आहे.

जगताप व बारणे तथा भाऊ व अप्पा यांच्यात यापूर्वीही खालच्या पातळीवरची टीका झाली आहे. एकमेकांना समोरासमोर व्यासपीठावर येण्याचे आव्हानही देऊन झाले आहे. नंतर हा कलगीतुरा आपोआप थांबलाही आहे. आगामी लोकसभेचे मावळचे संभाव्य प्रतिस्पर्धी असलेल्या या दोघांत तो गेल्या रविवारपासून नव्याने पुन्हा सुरु झाला आहे. 

आज जगताप यांच्यावतीने पक्षाचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी पत्रक काढले. त्यात ते म्हणतात, फोटोवाला खासदार बारणे हे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी नळावरची भांडणे करण्यातच धन्यता मानत आहेत. आम्ही विकासावर बोलण्याचे आव्हान दिले की ते चुप्पी साधतात. वायफळ आरोप करून चर्चेत राहण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु, फोटावाल्या खासदाराची ही बनवेगिरी शहरातील जनता आता खपवून घेणार नाही. खासदार म्हणून केलेली कामे जनतेला सांगण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. दहशतीच्या बळावर प्राधिकरणाच्या जागा ढापणाऱ्यांनी गुन्हेगारीवर बोलणे हास्यास्पद आहे. बारणे यांनी पाच वर्षांत फोटोवाला खासदार म्हणून भरपूर प्रसिद्धी मिळवली.

परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघात कोणती भरीव कामे केली हे दुर्बिण घेऊन शोधावे लागणार आहे. ते विकासकामांवरून भांडल्याचे पाच वर्षांत कधीच दिसले नाही. केवळ निवेदने देऊन चमकोगिरी करण्यातच त्यांनी धन्यता मानली. नळावरची भांडणे करण्यातच खासदारकीची पाच वर्षे त्यांनी वाया घालवली. बारणे यांनी माझ्यावर जेव्हा जेव्हा टिका किंवा आरोप केले, तेव्हा प्रत्येकवेळी विकासावर बोलण्याचे मी त्यांना आव्हान दिले आहे. परंतु, त्यांनी ते कधीच स्वीकारले नाही. विकास करण्याची क्षमता नसल्यामुळे फोटो काढून केवळ प्रसिद्धी मिळवण्यातच ते धन्यता मानत आहेत. अशा प्रकारे जनतेला फार काळ फसवता येत नाही. कामे करण्याऐवजी केवळ फोटो काढण्याची बनवेगिरी जनतेने ओळखली आहे. मी आमदार म्हणून चिंचवड मतदारसंघात काय विकास केला, हे शहरातील जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. प्रत्येकवेळी बोललेच पाहिजे असे नाही. बोललो तरच कामे होतात, असेही नाही. न बोलताही तसेच प्रसिद्धी न घेताही विकासकामांचा डोंगर उभा राहतो, असे त्यांनी नमूद केले आहे.
 
आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. जनतेला सामोरे जाताना काय विकासकामे केली हे खासदार बारणे यांना सांगावे लागणार आहे. परंतु, त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे कोणी कोणावर अतिक्रमण केले, कोण मौनी आमदार आहेत, हेच सांगून ते प्रसिद्धीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या जिवावर खासदार होऊन त्यांनी पाच वर्षे हे पद उपभोगले. परंतु, या पदाचा वापर भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी कधीच केला नाही. एवढेच नाही तर शिवसेनेच्या अमक्या कार्यकर्त्याला मोठे केले, हे सुद्धा ते सांगू शकणार नाहीत. उलट अनेक कट्टर शिवसैनिकांचे खच्चीकरण करून त्यांना राजकारणातूनच त्यांनी आऊट केले आहे. बारणे यांना दरवेळी संताजी धनाजीसारखा मीच दिसतो, हेच राजकीय वास्तव आहे. राजकारणात त्यांना नेहमी माझीच भिती वाटत आली आहे. एकीकडे पाच वर्षांच्या कार्यकाळात काहीच कामे केली नाहीत आणि दुसरीकडे माझ्यासारखा तगडा विरोधक पाहून ते वैफल्यग्रस्त बनले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख