pimpri-shivajirao-adhalrao-mahesh-landage | Sarkarnama

दोन दादांतील अबोला कायमच; शेजारी उभे राहून बोलणे नाही

उत्तम कुटे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

खासदारकीचे दोन संभाव्य दादा उमेदवार (शिवसेनेचे खासदार  शिवाजीराव आढळराव-पाटील आणि भाजपचे आमदार महेश लांडगे) हे काल पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीत एकत्र आले. त्यांनी भोसरी गणेशोत्सव महोत्सवाचे उदघाटन केले. भाषणही दिले. मात्र, दोघेही एकमेकांशी न बोलता निघून गेले.

पिंपरीः खासदारकीचे दोन संभाव्य दादा उमेदवार (शिवसेनेचे खासदार  शिवाजीराव आढळराव-पाटील आणि भाजपचे आमदार महेश लांडगे) हे काल पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीत एकत्र आले. त्यांनी भोसरी गणेशोत्सव महोत्सवाचे उदघाटन केले. भाषणही दिले. मात्र, दोघेही एकमेकांशी न बोलता निघून गेले. यावर्षी राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईरांच्या उपस्थितीमुळे महोत्सव खऱ्या अर्थाने पक्षविरहित वा सर्वपक्षीय झाला.

दोन्ही दादांचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे. विद्यमान खासदार शिवसेनेच्या दादांची उमेदवारी जवळपास पक्की झाली आहे. युती झाली नाही,तर भाजपचे आमदार दादा हे लोकसभेचे उमेदवार असण्याची दाट शक्यता व तशी चर्चाही आहे. गतवेळी (2014) भोसरी विधानसभा मतदारसंघाने आढळरावांना शिरूरमध्ये सर्वाधिक मताधिक्य दिले होते. त्यानंतर चार महिन्यांनी झालेल्या व युती तुटलेल्या विधानसभेला लांडगे हे अपक्ष म्हणून भोसरीतून निवडून आले आहेत. दोघेही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्ग विस्तारीकरण, पुणे-नाशिक रेल्वे, भोसरीतील अतिक्रमण, गुंडगिरी तसेच पिंपरी पालिका कारभारावरून दोन्ही दादांत आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे ते दोघे काल समोरासमोर आल्याने काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गणेश महोत्सव हा पक्षविरहित धार्मिक सोहळा असल्याने तेथे वाद न काढता दोन्ही दादांनी परिपक्वता दाखविली. त्याबद्दल संयोजक व उपस्थितांत कौतुकाची भावना दिसून आली.

दोन्ही दादांचे भोसरीवर प्रेम आहे. त्यातही भाजपचे दादा,तर भोसरीकरच आहे. त्यामुळे पक्षविरहित असलेल्या भोसरी महोत्सवाला ते दोघेही हजेरी लावतात. भोसरीतील विजय फुगे व अॅड.नितीन लांडगे व इतर पाच सहा मंडळाचे पदाधिकारी मिळून तीसजणांची समिती हा महोत्सव भरवित आहे. दोन दादा कधी उदघाटन,तर कधी समारोपाला असतात. महोत्सवाचे हे दहावे वर्ष. यावेळी योगायोगाने दोघेही उदघाटनाला काल एकत्र आले. त्यांनी महोत्सवाचे उदघाटन एकमेकांशेजारी उभे राहून दीप प्रज्वलन करून केले. नंतर ते व्यासपीठावर बसले. मात्र, त्यांच्यामध्ये राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते व नगरसेवक भाऊसाहेब भोईर असल्याने त्यांचा संवाद होऊ शकला नाही.

दोघांनीही भाषणे केली. त्यात त्यांनी एकमेकांच्या नावांचा उल्लेखही केला. मात्र, त्यांनी एकमेकांशी संवाद टाळला. सोहळ्याला प्रथम आमदारदादा व नंतर खासदारदादा आले. मात्र जाताना पहिले आमदार व नंतर खासदार गेले. खासदार हे महोत्सव सुरु झाल्यापासून त्याला नियमित हजेरी लावीत आहेत. तर, आमदारही गेल्या सहा वर्षापासून येत असल्याचे संयोजक अॅड. नितीन लांडगे यांनी सांगितले.       

संबंधित लेख