pimpri-shivajirao-adhalrao-demands-action-against-illegal-constructions | Sarkarnama

रोग एक, उपाय भलताच; पिंपरी महानगरपालिकेचा अजब कारभार

उत्तम कुटे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पिंपरी-चिंचवडमधील त्यातही भोसरीत पालिकेच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर भाजप सत्ताधारी महापालिकेने कारवाई केली नाही, तर त्याविरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळरावदादा-पाटील यांनी दिला आहे. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवडमधील त्यातही भोसरीत पालिकेच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर भाजप सत्ताधारी महापालिकेने कारवाई केली नाही, तर त्याविरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळरावदादा-पाटील यांनी दिला आहे. 

आपण हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याचे सांगून जागोजागी होणारी अतिक्रमणे पाहता तुम्ही स्मार्टसिटी कशी करणार असा सवालही  त्यांनी विचारला. पालिका प्रशासनाला हा इशारा देताना शिवसेनेच्या दादांचा रोख हा अप्रत्यक्षपणे भोसरीच्या दादांकडे होता, अशी चर्चा या बैठकीनंतर पालिका वर्तुळात रंगली होती. 

पालिकेत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत आढळरावदादांनी हा इशारा दिला. भोसरीत स्व. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी हे अनधिकृत पक्के गाळे उभारले आहेत. ते त्वरीत काढून टाकण्याची मागणी आढळराव यांनी मागील आढावा बैठकीत पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्यावर कारवाई न झाल्याने नुकत्याच झालेल्या या दुसऱ्या आढावा बैठकीत ते संतप्त झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

आपल्या मतदारसंघातील नाशिक फाटा ते मोशी दरम्यानच्या पुणे नाशिक महामार्गावरील अतिक्रमणांवर आजवर कोणती कारवाई केली अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर महापालिका अधिकाऱ्यांनी हातगाड्यांवर केलेल्या थातुरमातुर कारवाईची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतप्त झालेल्या आढळराव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आपण अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या पक्या व्यावसायिक बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तुम्ही त्याबाबत काय केले ते सांगा अशी विचारणा केली.

आढळराव यांचा रूद्रावतार पाहून हादरलेल्या अधिकाऱ्यांनी यावर धारण केलेले मौन पाहून आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे व  कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण पुढे केले. त्यावर आढळराव यांनी मुळात अधिकाऱ्यांची मानसिकता दिसत नसल्याचे सांगत पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले. किती वेळा पत्रव्यवहार केला असे विचारले. तसेच मी यासंदर्भात आपल्याला दिलेल्या पत्त्यावर अधिकृत उत्तर द्यावे. तसेच पोलीस प्रशासनाकडे केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

आपण हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याचे सांगून जागोजागी होणारी अतिक्रमणे पाहता तुम्ही स्मार्टसिटी कशी करणार असा सवाल विचारला. महापालिका अधिकाऱ्यांसाठी ही अतिशय लांच्छनास्पद बाब आहे असे सांगून तुमचा हा नकारात्मक दृष्टिकोन हे शहर बकाल करणार आहे याचा थोडा तरी विचार करा असे सांगून आयुक्तांना याची गंभीर दखल घेऊन त्वरीत कारवाई करा अन्यथा मला न्यायालयात या विरोधात याचिका दाखल करावी लागेल असा इशारा दिला.

भाजपने बेस्टची वेस्ट सिटी केली
शिवसेनेने अनधिकृत बांधकामावरून भाजपला एकीकडे लक्ष्य केले असताना, दुसरीकडे पालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर स्वच्छतेवरून हल्लाबोल केला. राष्ट्रवादीच्या काळातील बेस्ट सिटी असलेले पिंपरी-चिंचवड भाजपने दीड वर्षातच वेस्ट सिटी केले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी केला. आमच्या सत्ताकाळात स्वच्छतेत राज्यात एक नंबरवर असलेले पिंपरी भाजप राजवटीत 47 नंबरपर्यंत खाली घसरल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांचे निव्वळ मलई खाण्यावर लक्ष असून त्यातूनच त्यांच्या पंतप्रधान आवास योजनेतील निविदा रकमा दुप्पट आहेत, असे ते म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख