Pimpri Political News Jagtap Pawar Landge | Sarkarnama

लक्ष्मणभाऊ सावध,तर महेशदादा बिनधास्त : अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

उत्तम कुटे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

'पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना मी व पक्षाने लहानाचे मोठे केले असून ते सत्तेसाठी भाजपमध्ये गेले आहेत. भविष्यात दिवस बदलणार असल्याने त्यावेळी ते कुठे असतील, ते पाहा', या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर या दोघाही आमदारांकडून अपेक्षित अशी आक्रमक प्रतिक्रिया आज आली नाही.

पिंपरीः 'पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना मी व पक्षाने लहानाचे मोठे केले असून ते सत्तेसाठी भाजपमध्ये गेले आहेत. भविष्यात दिवस बदलणार असल्याने त्यावेळी ते कुठे असतील, ते पाहा', या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर या दोघाही आमदारांकडून अपेक्षित अशी आक्रमक प्रतिक्रिया आज आली नाही. त्यातून त्यांच्या मनात एकेकाळच्या या आपल्या 'गॉडफादर'विषयी अद्याप आदर असल्याचे दिसून आले. तसेच भविष्यात बदलणारी राजकीय समीकरणे ध्यानात घेऊन या दोघांनी आपल्या पूर्वीच्या राजकीय बॉसवर उलट प्रतिक्रिया देणे टाळले असावे, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.

पिंपरी--चिंचवडच्या राजकारणात जगताप हे भाऊ, तर लांडगे हे दादा म्हणून ओळखले जातात. तर पवार हे राज्यात दादा आहेत. जगताप व लांडगे यांच्या राजकीय जडणघडणीत पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी लांडगे व जगताप यांना नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, आमदार अशी संधी दिलेली आहे. त्यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली. दरम्यान, गत विधानसभेला जगताप यांनी कमळ हातात घेतले. तर, तिकिट न दिल्याने लांडगे यांनी बंडखोरी केली. जगताप हे चिंचवडमधून, तर लांडगे हे भोसरीतून अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्यामुळेच पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता सहा महिन्यापूर्वी गेली. हाच धागा पकडून काल पवार यांनी पिंपरीत या दोघांविषयी वरील वक्तव्य केले होते.

पवार यांच्या विधानावर जगताप यांना आज विचारले असता त्यावर काहीही बोलायचे नाही, असे म्हणत त्यांनी हुषारीने मौन बाळगणेच पसंत केले. त्यातून त्यांचा राजकीय मुत्सद्दीपणा व बेरजेचे राजकारण दिसून आले. तर, अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्याची बेधडक प्रतिक्रिया अजितदादांच्या वक्तव्यावर पैलवान असलेल्या महेशदादांनी आपल्या स्वभावानुसार दिली. मात्र, दोघांनीही पवार यांच्याविषयी कटू बोलणे आवर्जून टाळले. त्यामागे भविष्यात बदलणारी राजकीय समीकरणे आहेत, असे राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 

 

संबंधित लेख