pimpri-ncp-hallabol | Sarkarnama

`राष्ट्रवादी'चा दुसरा हल्लाबोल उद्यापासून; फ्रंटल आणि सेल राज्यप्रमुख दौऱ्यावर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा आक्रमक झाली आहे. ते केंद्र व राज्य सरकारविरुद्ध उद्यापासून दुसरा हल्लाबोल सुरु करीत आहेत. मात्र, यावेळचे हे आंदोलन टप्याटप्यातील नसून एकाचवेळी ते राज्याच्या सर्व पाच महसुली विभागात केले जाणार आहे. 

पिंपरीः भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा आक्रमक झाली आहे. ते केंद्र व राज्य सरकारविरुद्ध उद्यापासून दुसरा हल्लाबोल सुरु करीत आहेत. मात्र, यावेळचे हे आंदोलन टप्याटप्यातील नसून एकाचवेळी ते राज्याच्या सर्व पाच महसुली विभागात केले जाणार आहे. 

सात महिन्यावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांना सरकारविरोधी लढण्यासाठी एक नवी उर्मी देण्याच्या हेतूने हा दुसरा हल्लाबोल राष्ट्रवादीने आयोजित केला आहे. पक्षाचे फ्रंटल आणि सेलचे राज्यप्रमुख तो करणार आहेत. त्यात भाजप सरकारच्या शेतकरी आणि जनताविरोधी धोरणाबाबत व चुकीच्या निर्णयाविरोधात ते आवाज उठवणार आहेत. डिसेंबर २०१७ पासून सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढत सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोलमधून सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच अधिवेशनातही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे फ्रंटल आणि सेलचे प्रमुख सरकारवर हल्लाबोल करणार आहेत. उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर, कोकण विभाग, पुणे जिल्हा, विदर्भ, मराठवाडा या विभागात ते जाणार आहेत.  

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या २६ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत विदर्भात सरकारच्याविरोधात रान उठवणार आहेत. कोल्हापूर आणि कोकण विभागात सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड हे ८ ऑक्टोबरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रात ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे हे १० ऑक्टोबरपर्यंत दौरा करणार आहेत. तर पुणे जिल्हयामध्ये अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक हे २ ते १० ऑक्टोबरपर्यंत दौरा करणार आहेत. पक्षाच्या युवती, युवक आणि विद्यार्थी प्रमुखांचेही दौरे २६ सप्टेंबरपासून सुरु होत असून युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील आणि विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील हे तिघेही या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. 

युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर या ६ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा विभाग तर युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील हेही ३ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा पिंजून काढणार आहेत. विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील हे ९ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा पाढा वाचणार आहेत.

संबंधित लेख