Pimpri Mayor Election Role of NCP | Sarkarnama

पाच मिनिटाच्या अवधीने हुकली पिंपरी महापौरांची बिनविरोध निवड

उत्तम कुटे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

या निवडणुसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले होते. त्याला शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनीही दुजोरा दिला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. मात्र, त्याचवेळी या 'लोकल बॉडी इलेक्शन'ची जबाबदारी व अधिकार हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर दिले होते, असे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अर्ज माघारीसाठी काल आणखी पाच मिनिटांचा अवधी मिळाला असता, तर ही निवडणूक गेल्या वर्षाप्रमाणे बिनविरोध होण्याचीही शक्यता होती. त्याला खुद्द विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला.

पालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपच्या शहरातील गटबाजीमुळे पिंपरी महापौर उमेदवार निवडीपासून मुख्यमंत्र्यांना लक्ष द्यावे लागले. त्यांनीच दादा, भाऊ (भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे अपक्ष आमदार व भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे) समर्थकांच्या दावेदारीत आपले वजन दादा समर्थकाच्या पारड्यात टाकले. ओबीसीसाठी राखीव या पदावर पक्षाचा पहिला महापौर कुणबी ओबीसी झाल्याने ओरड झाली होती. त्यामुळे ही चुक सुधारून त्यापदी खरा ओबीसी बसविण्याच्या हेतूने मुख्यमंत्र्यांनी माळी समाजाचे नगरसेवक राहूल जाधव यांना महापौरपदाची संधी दिल्याची चर्चा आहे. हे दोन्ही गट व त्यांच्या म्होरक्यांनी या प्रतिष्ठीत पदासाठी वर्षा वारीही झाली होती. 

या निवडणुसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले होते. त्याला शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले, अजितदादांचा या निवडणुकीत कसलाही रोल नव्हता. आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्हाला विरोध दाखवायचा होता. त्यामुळे ही निवडणूक लढविण्याचा मी निर्णय घेतला. तसे विरोधी पक्षनेते दत्ताकाकांनाही सांगितले. आम्हाला जनतेने विरोधात ठेवलंय. म्हणून ती भुमिका आम्ही बजावली. मात्र, आमचा विकासाला विरोध नाही. शहराचा विकास झालाच पाहिजे, अशी आमची भुमिका आहे.

दत्ताकाका याबाबत म्हणाले, ''एकतर आम्हाला सत्ताधाऱ्यांनी मनापासून ही निवडणूक लढवू नका, असे सांगितले नव्हते. तसेच माघारीबाबतही त्यांची अशीच वरकरणी भुमिका राहिली. तरीही ऐनवेळी आम्ही माघार घेणार होतो. म्हणून अर्ज माघारीसाठी असलेल्या पंधरा मिनिटांच्या मुदतीत पाच ते दहा मिनिटांनी वाढ करण्याची मागणी मी केली होती. मात्र, ती फेटाळून लावण्यात आली आणि बिनविरोध निवडीचा मार्ग बंद झाला. तरीही महापौर हे मी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या समाविष्ट गावातील (चिखली) झाल्याचा मला आनंद आहे."

संबंधित लेख