pimpri-maratha-reservation-agitation-pune-administration | Sarkarnama

सामूहिक आत्महत्येचा डाव पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उधळला; मराठा मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांची धरपकड

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पुणे जिल्हाधिकारी इमारतीवरून उड्या मारून सामूहिक आत्महत्या करण्याचा सकल मराठा मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांचा आजचा (ता.4) डाव पोलिसांनी उधळला. त्यांनी या सर्वांना दोन दिवस अगोदरच ताब्यात घेऊन पुढील अनर्थ टाळला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

पिंपरीः पुणे जिल्हाधिकारी इमारतीवरून उड्या मारून सामूहिक आत्महत्या करण्याचा सकल मराठा मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांचा आजचा (ता.4) डाव पोलिसांनी उधळला. त्यांनी या सर्वांना दोन दिवस अगोदरच ताब्यात घेऊन पुढील अनर्थ टाळला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून ठावठिकाणा शोधून काढून ते भुमिगत होण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवडमधील (पुणे पोलिस आयुक्तालयाचे परिमंडळ तीन) वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली. एवढेच नाही, तर त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा केली. परवा रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले. काल त्या सर्वांना पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश मिळाला. 

मराठा आंदोलकांचे खटले मोफत लढविण्याचे पिंपरी वकील संघटनेने ठरविले आहे. मात्र, वाकड पोलिस ठाण्यातील खटले हे पुणे न्यायालयात चालत आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना तिकडे नेण्यात आले. परिणामी ते पिंपरी वकिलांच्या मोफत मदतीपासून वंचित राहिले. दुसरीकडे त्यांची रवानगीही तुरुंगात झाली. 10 तारखेपर्यंत हे कार्यकर्ते तुरुंगात राहणार असल्याने ऑगस्ट क्रांती दिनापासून म्हणजे 9 ऑगस्टपासून राज्य बंदमध्येही त्यांना सहभागी होता येणार नाही. 

संभाजी ब्रिगडचे पिंपरी-चिंचवड समन्वयक सतीश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर-पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र देवकर-पाटील, वैभव जाधव, अमोल मानकर, भय्यासाहेब राजधने, ज्ञानदेव लोभे, राजू पवार आणि अंतिम पवार अशी या कार्यकर्त्यांची नावे आहेत. 

ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे फोन बंद करण्यात आले. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आल्यानंतरही पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीभोवतालचा पोलिस बंदोबस्त व आत जाताना होणारी चौकशी कायम आहे.
 

संबंधित लेख