pimpri-maratha-reservation-agitation-9-august | Sarkarnama

मराठा आंदोलनाची 9 तारखेपासून पिंपरीत धग वाढणार; तिन्ही आमदारांना चिंता

उत्तम कुटे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणप्रश्नी आमदारांच्या घराबाहेरील आंदोलनाचे लोण पिंपरीतही येण्याची शक्यता वाटू लागली आहे. क्रांतीदिनापासून हे आंदोलन शहरात सुरु करण्याचा सकल मराठा मोर्चाचा बेत आहे. त्यामुळे भाजपच्या दोन्ही आमदारांच्या (लक्ष्मण जगताप व महेश लांडगे) जोडीने शहरातील तिसरे आमदार शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार यांचीही चिंता काहीशी वाढली आहे.

पिंपरीः मराठा आरक्षणप्रश्नी राजीनामा देऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनीच काल मुंबईत स्पष्ट केल्याने पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे दोन्ही आमदार निर्धास्त झाले आहेत. 

दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी आमदारांच्या घराबाहेरील आंदोलनाचे लोण पिंपरीतही येण्याची शक्यता वाटू लागली आहे. क्रांतीदिनापासून हे आंदोलन शहरात सुरु करण्याचा सकल मराठा मोर्चाचा बेत आहे. त्यामुळे निर्धास्त झालेल्या भाजपच्या दोन्ही आमदारांच्या (लक्ष्मण जगताप व महेश लांडगे) जोडीने शहरातील तिसरे आमदार शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार यांचीही चिंता काहीशी वाढली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात आता लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर ठिय्या, थाळीनाद, निदर्शने अशाप्रकारे आंदोलन राज्यभर सुरु झालेले आहे. ते शहराच्या वेशीपर्यंत म्हणजे जुळे शहर असलेल्या पुण्यातही आले आहे. काल व आज तेथे ते झाले. त्यानंतर आता त्याची धग पिंपरीलाही बसण्याची शक्यता वाटू लागली आहे. येथील आमदारांच्याही निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्याचा सकल मराठा मोर्चा समाज कार्यकर्त्यांचा दबाव वाढू लागला आहे. त्यातून आतापर्यंत फक्त राजीनाम्याची मागणी झालेल्या शहरातील भाजपच्या आमदार जोडगोळीविरुद्ध (दादा,भाऊ) आंदोलनाचे हत्यार उपसले जाण्याची शक्यता आहे.

परिणामी शोकसभा, निषेधसभा, बंद यापुरते मर्यादीत राहिलेले मराठा आरक्षण आंदोलन शहरात तीव्र होण्याच्या भीतीने पोलिसांची झोप उडाली आहे.

मराठा मोर्चा 9 ऑगस्टपासून राज्य बंद करणार आहे. त्याच दिवशी उद्योगनगरीच्या अप्पर तहसीलदार कार्यालय आणि महापालिकेला टाळे ठोकण्याचा विचार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी `सरकारनामा'ला सांगितले. याबाबत तसेच शहरातील आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय बैठक घेऊन सर्वसंमतीने लगेच घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.

संबंधित लेख