pimpri-hinjawadi-rape-case   | Sarkarnama

हिंजवडीतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटणार

उत्तम कुटे 
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

हिंजवडीजवळील कासारसाई येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्य़ा अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे.

पिंपरीः हिंजवडीजवळील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक मुलगी ही मूळची नगर जिल्ह्यातील पाथर्डीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे राज्यभर गाजलेल्या व सकल मराठा आंदोलनासाठी एक कारण ठरलेल्या नगर जिल्ह्यातीलच कोपर्डी (ता.कर्जत) येथील विद्यार्थिनीवरील अशाच क्रूर अत्याचार व खूनाच्या घटनेच्या स्मृती पुन्हा चाळवल्या गेल्या आहेत. या गंभीर गुन्ह्याची भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी दखल घेतली आहे.

दरम्यान, या घटनेतील ऊसतोड कामगारांच्या या दोन बारा वर्षीय मुलींपैकी एकीचा मृत्यू झाल्याने तिच्यावर सामूहिक पाशवी अत्याचार झाले असावेत, असा संशय आहे. त्याला पोलिसांनीही दुजोरा दिला. त्या दृष्टीनेही तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) सतीश पाटील यांनी आज `सरकारनामा'ला सांगितले. मृत मुलीच्या मृत्युमागील नेमके कारण कळण्यासाठी तिचा व्हिसेरा राखून ठेवला असल्याचे तपासाधिकारी शिवाजी गवारे म्हणाले. तसेच या प्रकरणामुळे भडका उडू नये म्हणून या गुन्ह्यात डमी आरोपी उभा केल्याची चर्चा व होत असलेला आरोपही या पोलिस अधिकाऱ्यांनी फेटाळला.

हिंजवडीजवळील कासारसाई येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्य़ा अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे. तर, राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्या व भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड माधवी नाईक व प्रदेश चिटणीस उमा खापरे यांच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड महिला मोर्चाच्या अध्यक्षा शैलजा मोळक आणि इतर पदाधिकारी सुरेखा बनकर, शोभा भराडे, बेटी बचाव, बेटी पढावचे समन्वयक अमित गुप्ता यांनी काल पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आज अॅड. नाईक या गृहखात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. तर, शहर भाजप महिला मोर्चाचे शिष्टमंडळ पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना भेटणार आहे. भाजपनंतर राष्ट्रवादीनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. एकूणच महिलांवरील वाढत्या अत्याराच्या निषेधार्थ शहर महिला राष्ट्रवादीने दुपारी आंदोलन केले.

अधिक शिक्षेसाठी खूनाऐवजी बलात्काराचा गुन्हा नोंद 
जेमतेम सुरु होऊन महिना झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ही सर्वात गंभीर आणि खळबळजनक घटना असल्याने पोलिसांनीही ती गांभिर्याने घेतली आहे. या प्रकरणातील एका मुलीवरील लैंगिक अत्याचारातून तिचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे खून व बलात्कार अशी दोन्ही कलमे पोलिसांना लावता येणार होती. मात्र, अल्पवयीन मुलीवरील अत्याचारात तिचा मृत्यू झाला, तर वीस वर्षाची शिक्षा आहे. दुसरीकडे खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची (14 वर्षे) तरतुद आहे. त्यामुळे बलात्काराचे कलम (376अ) लावल्याचे हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व या गुन्ह्याचे तपासाधिकारी शिवाजी गवारे यांनी सरकारनामाला सांगितले.
 

संबंधित लेख