pimpri-hacker-robs-laxman-jagtap-brother | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंना सायबर चोरांचा हिसका; क्रेडीट कार्ड हॅक करून सव्वाचार लाखाला गंडा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुण्यातील कॉसमॉस बॅंकेवरील सायबर दरोड्याची मिनी पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमध्ये झाली आहे. शहरातील बिल्डर व भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगतापांचे सख्खे धाकटे बंधू, माजी नगरसेवक शंकरराव जगताप यांनाच सायबर चोरांनी सव्वाचार लाख रुपयांना गंडा घातला आहे.

पिंपरीः पुण्यातील कॉसमॉस बॅंकेवरील सायबर दरोड्याची मिनी पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमध्ये झाली आहे. शहरातील बिल्डर व भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगतापांचे सख्खे धाकटे बंधू, माजी नगरसेवक शंकरराव जगताप यांनाच सायबर चोरांनी सव्वाचार लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यांचे क्रेडीट कार्ड हॅक करून सव्वाचार लाख रुपयांचे परकीय चलन त्याव्दारे काढण्यात आले आहे. कॉसमॉसचीही अशाच पद्धतीने 92 कोटी रुपयांची फसवणूक नुकतीच केली गेली आहे. 

ज्याअर्थी डॉलरमध्ये ही फसवणूक करण्यात आली आहे, त्याअर्थी ती परदेशात झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळे त्याची उकल लगेच होण्याची शक्यता कमी दिसते आहे. दुसरीकडे या वाढत्या सायबर गुन्ह्यांनी पोलिस त्रस्त झाले आहेत. अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्काराच्या कासारसाई, हिंजवडीतील घटना ताजी असतानाच त्यालगतच्या पोलिस ठाण्यातच नव्या पिंपरी पोलिस आयुक्तालयात हा दुसरा गंभीर आर्थिक स्वरुपाचा मोठा गु्न्हा घडला आहे. त्यात तो सत्ताधारी आमदारांच्या बाबतीत ते राहत असलेल्या भागात घडल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. 

त्याबाबत शंकरराव पांडुरंग जगताप (वय 44,रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी सायबर अॅक्टनुसार  फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे तपास करीत आहेत. नव्या पोलिस आयुक्तालयात पुरेशा मनुष्यबळाअभावी सायबर सेल अद्याप स्थापन करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुणे पोलिसांच्या सायबर सेलची मदत सांगवी पोलिस घेणार आहेत. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस तारखेला ही फसवणूक झाली आहे. जगताप यांच्याकडे अमेरिकन एक्स्प्रेस बॅंकेचे क्रेडिट कार्ड आहे. ते हॅक करून त्यांच्या खात्यातून पाच हजार 626 अमेरिकन डॉलर्स काढण्यात आले. एवढी रक्कम बॅंक खात्यातून वजावट झाल्याचा मेसेज आल्यानंतर जगताप यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.

संबंधित लेख