pimpri-girish-bapat-sachin-sathe | Sarkarnama

गिरीश बापट यांचा डाव आमच्यामुळे फसला : सचिन साठे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनडीटीए) "पीएमआरडीए'मध्ये विलीनीकरण करून पिंपरी-चिंचवडवर दरोडा टाकण्याचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा डाव आमच्या प्रखर विरोधामुळे फसल्याचा दावाही कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज केला.

पिंपरीः राज्यात सत्तेत असलेली शिवसेना, भाजप पंचपक्वानांवर ताव मारून भुकेल्या जनतेचा कळवळा असल्याचे दाखवीत आहे, अशी घणाघाती टीका पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसने आज केली. तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनडीटीए) "पीएमआरडीए'मध्ये विलीनीकरण करून पिंपरी-चिंचवडवर दरोडा टाकण्याचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा डाव आमच्या प्रखर विरोधामुळे फसल्याचा दावाही कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज केला. महामंडळ नियुक्तीवर वरील प्रतिक्रिया देताना ते येथे बोलत होते. 

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी व्हावी, पण ती सन्मानजनक झाली पाहिजे, असे साठे म्हणाले. त्याचवेळी हा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना व भाजपवर त्यांनी कडाडून टीका केली. सत्ता भोगून शिवसेना टीकेचे नाटक करीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. त्यातही निवडणूक जवळ आली, की हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करतात. पण, पंक्तीत ते एकत्र असतात आणि बाहेर भांडतात, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. राजीनाम्याचे महत्त्वच कमी करण्याचे श्रेय शिवसेनेला जाते,असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या राजीनामा नाट्याची खिल्ली उडविली. 

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही प्राधिकरणाच्या विलीनीकरणाची मागणी झाली होती. मात्र, आमच्या विरोधामुळे ती त्यावेळी टळली होती. असा दावा साठे यांनी केला. नंतर पालकमंत्र्यांनी पुन्हा तो घाट घातला. मात्र, हा शहरावरील दरोडा असल्याने त्याला कॉंग्रेसने प्रखर विरोध केल्यानेच विलीनीकरण टळून प्राधिकरणावर अध्यक्ष आता नेमला गेला आहे, असे ते म्हणाले. प्राधिकरण स्थापण्यामागील हेतू नवनियुक्त अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी आता,तरी साध्य करावा, असे नमूद करीत 46 वर्षानंतरही प्राधिकरण स्थापनेमागील हेतू सफल झाला नसल्याचेच त्यांनी सांगितले. 

31 तारखेपासून पक्षाने कोल्हापूरपासून सुरू केलेली संघर्ष यात्रा पूर्वनियोजनानुसार 8 सप्टेंबरऐवजी आता एक दिवस अगोदर म्हणजे 7 तारखेला पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणार असल्याचे साठे म्हणाले. पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार अशोक मोहोळ, नाना नवले, आमदार संग्राम थोपटे आदी त्यात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील जनतेच्या पिळवणूकीविरोधात आवाज उठविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असून तिच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्याचा समारोप पुण्यात 8 तारखेला होणार आहे, असे ते म्हणाले. या यात्रेमुळे दुहेरी फायदा होणार असून पक्षात चैतन्य निर्माण होऊन शहराच्या समस्याही पुढे येतील, असे त्यांनी नमूद केले. 

संबंधित लेख