pimpri-dhangar-community-morcha-24-august | Sarkarnama

धनगर समाजाचा पिंपरी-चिंचवडमध्ये 24 ऑगस्टला मोर्चा

उत्तम कुटे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

भगव्या वादळानंतर आरक्षणासाठी आता पिवळे वादळ सुरु होत आहे. तर, एक मराठा, लाख मराठा या घोषणेनंतर एक धनगर, लाख धनगर ही नवे घोषवाक्यही ऐकायलाही मिळणार आहे.

पिंपरीः भगव्या वादळानंतर आरक्षणासाठी आता पिवळे वादळ सुरु होत आहे. तर, एक मराठा, लाख मराठा या घोषणेनंतर एक धनगर, लाख धनगर ही नवे घोषवाक्यही ऐकायलाही मिळणार आहे. धनगर आरक्षणाचे हे पिवळे वादळ येत्या शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे राज्य सरकारविरुद्ध हा हल्लाबोल विरोधी पक्षाने केलेला नाही. तर, तो धनगर समाजाच्या भाजप पदाधिकाऱ्यानेच केला आहे. त्यामुळे हा भाजप सरकारला घरचा आहेर समजला जात आहे. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू दुर्गे यांनी शहरातून तहसीलदार कचेरीवर जाणाऱ्या मोर्चासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यांची सध्या त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्याकरिता बैठकासत्र चालू करण्यात आले आहे. सोशल मिडियावरही पोस्ट फिरत आहेत. एक धनगर, लाख धनगर या नावे फेसबुक पेजही उघडण्यात आले आहे.  समाज बांधवांचे 24 ऑगस्टचे आरक्षण आंदोलन कसे असावे या संदर्भात टिप्स देणारा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 

`होय मी येणार, तुम्ही पण या 
सर्वांना सांगा 24 ऑगस्ट
धनगर समाजाची पायदळ
घेऊन येणार पिवळं वादळ
एक दिवस समाजासाठी
एक दिवस सगळी कामे बंद
24 ऑगस्ट मोर्चा यशस्वी करु 
चलो पिंपरी! चलो पिंपरी !!
शुक्रवारी सकाळी 10 वाजता
तुम्ही या बाकीच्यांना पण आणा'

अशी समाजाला हाक देणारी भावनिक पोस्ट सोशल मिडियात व्हायरल झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज महासंघाने ही भावनिक हाक दिली आहे. 

यासंदर्भात आंदोलनाच्या 22 केसेस दाखल असलेले दुर्गे म्हणाले, की हा मोर्चा कुठली व्यक्ती वा नेत्याविरुद्ध नाही. तसेच सरकारविरुद्ध आहे. तो अतिशय शांततेत काढला जाणार आहे. त्यात सार्वजनिक मालमत्तेचे अजिबात नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे.

संबंधित लेख