Pimpri deserves ministerial berth : Mahesh Landge | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद मिळायला हवे : महेश लांडगे 

उत्तम कुटे
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

शहराला मंत्रिपद मिळेल का असे विचारले असता ते मिळायला हवे, असे महेशदादा म्हणाले. मला वा भाऊ (जगताप) कुणालाही मिळावे, त्यानिमित्ताने ते शहराला पहिल्यांदा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पिंपरीः  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दोन वर्षाहून अधिक काळ रेंगाळल्याने त्यात स्थान मिळेल,ही आशा पिंपरी-चिंचवडकरांनी आता सोडून दिली आहे. मात्र, त्यासाठी नाव घेतले जात असलेले शहरातील आमदार महेशदादा लांडगे,मात्र अद्याप आशावादी आहेत. पिंपरीला मंत्रिपद मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी मंगळवारी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. 

दरम्यान, मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याने एरव्ही मोकळेचाकळे   बोलणाऱ्या दादांच्या बोलण्यात आता सावधपणा व परिपक्वता दिसून येत आहे. तसेच वादग्रस्त विधानेही ते खुबीने टाळत आहेत.

शहरातून वाहणारी व राज्यभरातील वारकऱ्यांच्या दृष्टीने पवित्र असलेली,मात्र सध्या गटारगंगा झालेली इंद्रायणी स्वच्छता अभियानासाठी लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.त्यासाठी येत्या 2 डिसेंबरला "रिव्हर सायक्‍लोथॉन' हा जनजागृतीपर उपक्रम होणार आहे. त्याची माहिती दिल्यानंतर ते 'सरकारनामा'शी बोलत होते.

 गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असतानाही नदी स्वच्छता अभियान घेण्यास उशीर झाला नाही का? केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नदीसुधारसाठी पुण्याला निधी दिला,पण पिंपरीला का नाही हे अडचणीचे प्रश्‍न त्यांनी टोलविले. नगरसेवक असताना आमदार झालात.

आता खासदार होणार का? या प्रश्‍नालाही त्यांनी खुबीने बगल दिली. नदी प्रदूषण रोखण्यात खासदार (आमदार महेशदादांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळरावदादा-पाटील) कमी पडले का यालाही सामाजिक प्रश्‍नावर (नदी प्रदूषण) जमलो असल्याचे सांगत त्यांनी वाद ओढवून घेणे टाळले. 

पिंपरी पालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आणल्याने महेशदादांचे व भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव मंत्रिपदासाठी घेतले जात आहे. तसे आश्‍वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. यानिमित्ताने शहराचा मंत्रिपदाचा बॅकलॉग भरून निघणार आहे. उद्योगनगरीला प्रथमच मंत्रिपदही मिळणार असल्याने शहरवासीयांचे लक्ष त्याकडे लागलेले आहे.

मात्र, मंत्रीपदाने एकदा नव्हे,तर अनेकदा हुलकावणी दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी त्याची आशा आता सोडूनच दिली आहे. तसेच त्यासाठी इच्छुक दोन्ही आमदारांचे समर्थकही नाराज झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहराला मंत्रिपद मिळेल का असे विचारले असता ते मिळायला हवे, असे महेशदादा म्हणाले. मला वा भाऊ (जगताप) कुणालाही मिळावे, त्यानिमित्ताने ते शहराला पहिल्यांदा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

 

संबंधित लेख