pimpri-datta-sane-shravan-hardikar-tukaram-munde | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

तुम्हाला मुंडे नको असतील, तर आम्हाला द्या; पिंपरीच्या विरोधी पक्षनेत्यांचा भाजपला आहेर 

उत्तम कुटे 
रविवार, 2 सप्टेंबर 2018

पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर झालेल्या एकेरीतील वादातून पिंपरी-चिंचवड पालिकेतील आक्रमक स्वभावाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आता अधिक आक्रमक झाले आहेत.

पिंपरीः पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर झालेल्या एकेरीतील वादातून पिंपरी-चिंचवड पालिकेतील आक्रमक स्वभावाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आता अधिक आक्रमक झाले आहेत. भाजपने अविश्‍वास ठराव आणलेले नाशिक पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे तुम्हाला नको असतील, तर आम्हाला द्या, असा आहेर त्यांनी भाजपला दिला आहे.याव्दारे त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या कथित भ्रष्टाचाराला रोख लावून आपला अपमान करणाऱ्या आयुक्तांना धडा शिकविण्याचा दुहेरी हेतू यामागे साने याचा असल्याचे दिसून येत आहे. 

दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत हर्डीकर व साने यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याच दिवशी साने यांनी हर्डीकर यांच्यावर सडकून टीकाही केली होती. दरम्यान, मुंडे प्रकरण समोर आले. नाशिक पालिकेत सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दिला होता.मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे तो तूर्त टळला. हा धागा पकडून त्यांना मुंडे नको असतील, तर आम्हाला ते द्या, अशी मागणी साने यांनी केली आहे. याव्दारे भाजपला आपले भय ना भ्रष्टाचार या घोषणेनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये कारभार करता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच हर्डीकर यांनी त्यांना अज्ञानी संबोधल्याचा वचपा काढून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. मुंडेंना पिंपरीत आणण्याची मागणी करून त्यांनी वादग्रस्त हर्डीकर यांच्या बदलीचीच अप्रत्यक्ष मागणी केली आहे. वेळ पडली,तर मुख्यमंत्र्यांकडे ती सुद्धा करू, असे ते सरकारनामाशी बोलताना म्हणाले. 

दरम्यान, आयुक्तांबरोबर त्यांचे सहकारी अधिकाऱ्यांनाही साने यांनी दुसरीकडे लक्ष्य केले आहे. पंतप्रधान आवास योजनेचा चुकीचा डीपीआर बनवून पालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोचविणारे सह शहर अभियंता राजन पाटील व कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांना निलंबित करून त्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याजोडीने पालिका गैरकारभाराविरुद्ध या ना त्या प्रकारे आवाज उठविण्याचे त्यांचे काम सुरूच असून दररोज एक दोन प्रकरणात ते आयुक्तांना निवेदन देत आहेत. त्यामुळेच वैतागलेल्या आयुक्तांनी साने यांचा भर बैठकीत परवा अपमान केल्याचे समजते. 

संबंधित लेख