pimpri-congress-yatra-local-issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

कॉंग्रेसच्या संघर्ष यात्रेत राष्ट्रीय प्रश्नांवरच उहापोह; पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक प्रश्न राहिले बाजूला

उत्तम कुटे
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि भाजप यांसह राष्ट्रीय प्रश्नावर जोरदार टीका करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना पिंपरी-चिंचवडमधील जटील, प्रलंबित अशा गंभीर प्रश्नांचा काल विसर पडला. स्थानिकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नी त्यांनी चकार शब्दही संघर्ष यात्रेदरम्यान काढला नाही. त्यामुळे तो चर्चेचा मोठा विषय नंतर झाला.

पिंपरीः पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि भाजप यांसह राष्ट्रीय प्रश्नावर जोरदार टीका करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना पिंपरी-चिंचवडमधील जटील, प्रलंबित अशा गंभीर प्रश्नांचा काल विसर पडला. स्थानिकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नी त्यांनी चकार शब्दही संघर्ष यात्रेदरम्यान काढला नाही. त्यामुळे तो चर्चेचा मोठा विषय नंतर झाला.

कॉंग्रेसची 31 ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरु झालेल्या पहिल्या टप्यातील संघर्ष यात्रा काल (ता.7) उद्योगनगरीत आली. तिचे स्वागत मोटारसायकल रॅलीने करण्यात आले. नंतर नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात सभा झाली. त्यात राज्याचे दोन्ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात आदी माजी मंत्री व इतर वक्ते भाजप, पीएम व सीएम आणि त्यांच्या कारभारावर तुटून पडले. भाजपच्या पोकळ आश्वासनांवर त्यांनी सडकून टीका केली. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी तर आर्थिक आकडेवारीचा आधार घेत नोटाबंदी, जीडीपी, अर्थव्यवस्थेवरही हल्लाबोल केला. मात्र, राष्ट्रीय व राज्य पातळीवर प्रश्न लक्ष्य करताना त्यांच्याकडून स्थानिक गंभीर, ज्वलंत व गेली कित्येक वर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांकडे पूर्ण दूर्लक्ष झाले. त्यात राज्यात सर्वाधिक गंभीर असा अनधिकृत बांधकामाचा उद्योगनगरीत सर्वात मोठा प्रश्न आहे. अशी लाखो बांधकामे शहरात आहेत. त्यातून निर्माण झालेल्या शास्तीकराने रहिवासी त्रस्त आहेत. रेड झोनमुळे लाखो रहिवाशांच्या मानेवर टांगती तलवार आहे. 

पंतप्रधान आवास योजनेत दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा सत्ताधारी भाजपने केल्याचा आरोप आहे. तसाच तो कचरा वाहतुकीत आणि रस्तेबांधणीतही झाल्याचा विरोधकांचा दावा आहे. तशा तक्रारी थेट मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेल्या आहेत. एवढेच नाही, तर त्याची त्यांनी दखल घेऊन चौकशीही लावलेली आहे. हे प्रश्न नेते उपस्थित करतील. जेणेकरून त्याची चर्चा होऊन ते मार्गी लागतील, अशी शहर कॉंग्रेसला आशा होती. त्याचा उल्लेखही शहराध्यक्ष सचीन साठे यांनी आपल्या प्रास्ताविकात केला होता. त्यामुळे वरिष्ठ त्यावर भाष्य करतील, असे उपस्थितांना वाटले होते. मात्र, त्यांची गाडी ही पीएम,सीएम आणि भाजपच्या दिशेनेच सूसाट गेली. त्यामुळे शहर कॉंग्रेसचा काहीसा हिरमोड झाल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.

दुसरीकडे `राष्ट्रवादी'ने आपल्या हल्लाबोल यात्रेत स्थानिक प्रश्न हिरीरीने मांडले होते. त्यामुळे ते चर्चेत आले. एवढेच नाही, तर पालिकेतील सत्ताधारी भाजपचे त्याकडे लक्ष वेधण्यास त्यांना यश आले. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनंजय मुंढे या राज्य पातळीवरील नेत्यांनी हल्लाबोलच्या उद्योनगरीतील तीन सभांत स्थानिक प्रश्नांवरही हल्लाबोल केला होता. हल्लाबोल व संघर्ष यात्रेचा एक हेतू स्थानिक प्रश्न पुढे आणून त्यावर चर्चा करणे हा सुद्धा आहे. तो राष्ट्रवादीने पिंपरीतच नव्हे, तर राज्यभर साध्य केला. कॉंग्रेसला त्यात अपयश आल्याचे किमान पिंपरीत तरी दिसून आले. हा मोठा फरक दोन्ही कॉंग्रेसच्या या दोन यात्रांत पिंपरीत दिसला.

संबंधित लेख