pimpri-congress'-jansangharsh-yatra-on-8-september | Sarkarnama

`राष्ट्रवादी'च्या हल्लाबोलनंतर आता कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने कॉंग्रेस पक्ष आता राज्यात जागा झाला आहे. गेल्यावर्षी राष्ट्रवादीने राज्यभर काढलेल्या हल्लाबोल यात्रेनंतर कॉंग्रेसही तशीच यात्रा आता काढत आहे. तिला त्यांनी जनसंघर्ष यात्रा असे नाव दिले आहे. तिचा हल्लाबोलसारखाच उद्देश आहे. 

पिंपरीः लोकसभा निवडणूक जवळ आल्याने कॉंग्रेस पक्ष आता राज्यात जागा झाला आहे. गेल्यावर्षी राष्ट्रवादीने राज्यभर काढलेल्या हल्लाबोल यात्रेनंतर कॉंग्रेसही तशीच यात्रा आता काढत आहे. तिला त्यांनी जनसंघर्ष यात्रा असे नाव दिले आहे. तिचा हल्लाबोलसारखाच उद्देश आहे. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने जाहिरनाम्यात दिलेली कोणते आश्वासने सत्तेत आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात पूर्ण केली, याचा जाब विचारण्यासाठीची जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. 31 ऑगस्टपासून ती कोल्हापूरातून सुरु होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली येथे जनजागृती केल्यानंतर ती 8 सप्टेबरला पिंपरीत दाखल होणार आहे.  

केंद्र व राज्य सरकारच्या भूलथापा, फसवी आश्वासने, नागरिकांच्या पैशांवरील जाहिरातबाजी यांचा पर्दाफाश करण्यासाठी ती काढली जात आहे. या यात्रेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्य प्रभारी मल्लीकार्जून खर्गे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस तसेच सर्व प्रदेश कार्यकारीणीतील पदाधिकारी पिंपरीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचीन साठे यांनी आज येथे दिली.

साडेचार वर्षापूर्वी केंद्रात व त्यानंतर राज्यात भाजपप्रणीत सरकार स्थापन झाले. त्यानंतरच्या कार्यकालात भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा मलीन झाली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक उद्योग क्षेत्रात घटली. मागील वर्षी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय यामुळे देखील औद्योगीक गूंतवणुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, गुन्हेगारी, महागाईत लक्षणीय वाढ झाली आहे. बांधकाम क्षेत्रासह उद्योग व्यापारात देखील मंदीचे सावट आहे. 
सुशिक्षित पदवीधर, द्विपदवीधर लाखो युवक-युवती बेरोजगार आहेत. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्राचा जाहिरातबाजीचा फसवा फुगा आता फुटला आहे. शेतक-यांच्या शेतमालाला दीडपट हमी भाव देऊ, सातबारा कोरा करू, सिंचनक्षमता वाढवू, देशात उत्पादीत शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊ अशी शेकडो आश्वासने नागरिकांच्या पैशातून जाहिरातबाजी करून भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने करदात्या नागरिकांच्या माथी मारली आहेत. 

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिक्षण क्षेत्रात आठवड्याला एक नवीन आदेश काढून शिक्षणाचा सरकारने विनोदच केला आहे. सर्व आघाड्यांवर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरलेले असताना हायपरलूप, बुलेट ट्रेन अशी कधीही पूर्ण न होणारी स्वप्न दाखवून नागरिकांच्या पैशांचा चुराडा केला जात आहे, अशा लाखो कोटींच्या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय बँकांतून कर्ज घेऊन देशाभिमान सांगणाऱ्या भाजपने बुलेट ट्रेनचे काम परदेशी संस्थांना देऊन कोणता विकास साध्य होणार आहे. युपीएच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकासदर 10.2 टक्क्यांहून जास्त होता. यांच्या काळात हाच दर 7.2 टक्के गाठणे देखील अशक्य झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असतानाही अनावश्यक प्रकल्प नागरिकांच्या माथी मारले जात आहेत. युपीए सरकारने उभारलेल्या विकासकामांची उद्‌घाटने करून श्रेय लाटणाऱ्या या सरकारचा भंपकपणा उघडा करण्यासाठी पक्षाची ही यात्रा राज्यभर फिरून जनजागृती करणार आहे, असे साठे म्हणाले.
 

संबंधित लेख