pimpri-CM-Fadanvis-attend-marriage-of-pansare's-daughter | Sarkarnama

भाजपच्या आझमभाईंच्या मुलीच्या निकाहाला `राष्ट्रवादी'चे नेते वऱ्हाडी 

उत्तम कुटे 
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

विधान परिषदेची उमेदवारी आणि महामंडळावरील वर्णीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावललेले पिंपरी-चिंचवडचे भाजपचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या मुलीच्या निकाहाला, मात्र मुख्यमंत्र्यांनी शनिवारी (ता.24) रात्री दीड तास हजेरी लावून भाईंची नाराजी दूर करण्याचा काहीसा प्रयत्न केला.

पिंपरीः विधान परिषदेची उमेदवारी आणि महामंडळावरील वर्णीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावललेले पिंपरी-चिंचवडचे भाजपचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या मुलीच्या निकाहाला, मात्र मुख्यमंत्र्यांनी शनिवारी (ता.24) रात्री दीड तास हजेरी लावून भाईंची नाराजी दूर करण्याचा काहीसा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर मुख्यमंत्र्यांनी निकाहनाम्यावर एक साक्षीदार म्हणून सहीही केली. त्यामुळे भाई समर्थकांची नाराजी थोडी दूर झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाईंच्या मुलीच्या या लग्नाला राष्ट्रवादीचे मातब्बर नेते सुद्धा वऱ्हाडी लाभले. 

पानसरे हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक होते. मात्र, अजित पवार यांच्याशी बिनसल्याने त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, येथेही त्यांना डावलण्यात आले आहे. विधानपरिषद वा महामंडळ मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. भाजपचे आमदार व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेश लांडगे या शहरातील दोन्ही आमदारांनी जोर लावूनही भाईंचे पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे ते नाराज होते. हे लक्षात आल्याने पुणे जिल्हा दौऱ्यावर शनिवारी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दिवसभराच्या टाइट शेड्यूलमधून रात्री वेळ काढला. 

सूस येथील भाईंची कन्या अमीरा व मुंबईतील टिंबर मर्चंट सुफीयान यांच्या निकाहाला ते आवर्जून गेले. दीड तास त्यांनी या लग्नाचा सर्व रस्मरिवाज पाहिला. नंतर मिष्टान्न भोजनही त्यांनी घेतले. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार दादा, भाऊ, महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, पुण्यातील माजी आमदार विनायक निम्हण, माजी सनदी अधिकारी दिलीप बंड आदी यावेळी उपस्थित होते. 

मुस्लिम धर्मियांत प्रथा, परंपरेने लग्न झाले, तरी त्याची मशिदीच्या रजिस्ट्रारमध्ये नोंद केली जाते. त्यासाठी निकाहनामा केला जातो.त्यावर वधू आणि वरपक्षाकडील एकेका मान्यवराची साक्षीदार म्हणून सही घेतली जाते. वधूकडील साक्षीदार म्हणून मुख्यमंत्र्यांनी सही केली. या प्रक्रियेत वकील म्हणून (दोन्ही बाजूंचे) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी यांनी काम पाहिले.  
 

संबंधित लेख