pimpri-chinchwad-swine-flu-politics | Sarkarnama

आता `स्वाइन फ्लू'वरही होणार का पिंपरी-चिंचवड महापालिकेची विशेष सभा ?

उत्तम कुटे
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

स्वाइन फ्लू या आजाराच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे विशेष सभा बोलावण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. हा सत्ताधारी भाजपला घरचा आहेर समजला जात आहे. ही मागणी मान्य झाली,तर याप्रश्नी विशेष सभा प्रथमच होणार आहे. 

पिंपरीः स्वाइन फ्लू या आजाराच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे विशेष सभा बोलावण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. हा सत्ताधारी भाजपला घरचा आहेर समजला जात आहे. ही मागणी मान्य झाली,तर याप्रश्नी विशेष सभा प्रथमच होणार आहे. 

दरम्यान, या साथाने यावर्षी आतापर्यंत घेतलेल्या वीस बळींप्रकरणी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये, अशी विचारणा पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

साने यांनीही थैमान घातलेल्या याप्रश्नी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. साने व वाघेरे या दोघाही सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी शहरात बोकाळलेल्या या आजारासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाला जबाबदार धरले आहे. त्यानिमित्त कधीही न जुळणारे राष्ट्रवादी व भाजपचे सूर जूळून आले आहेत. या दोघांनीही आपापल्या मागणीचे निवेदन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना एकाच दिवशी म्हणजे काल दिले. त्यावर आयुक्त हे याप्रकरणी योग्य त्या उपाययोजना सुरु असल्याचे शासकीय पठडीतले उत्तर देतील, अशी शक्यता त्यांचा आतापर्यंतचा कारभार पाहता आहे. 
 
याबाबत वाघेरे म्हणाले, की १० सप्टेंबरला एका दिवसात या आजाराने ६  जणांचा बळी गेला. तर यावर्षीचा हा आकडा वीसवर गेला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ही पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या दृष्टीने लाजीरवाणी बाब आहे. वैद्यकीय विभाग अधिकारी हे एकमेकांची कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत.मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांचे या गंभीर आजारावर कसलेही लक्ष नाही. दिवसागणिक रुग्ण मरत असताना पालिकेच्या वायसीएम वा इतर रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष तातडीने सुरु करणे आवश्यक होते. मात्र २० रुग्ण शहरात मृत्यूमुखी पडूनही मनपा प्रशासनाला जाग आलेली नाही.

शहरातील नागरिक भयभीत झाले असून रुग्णांना योग्य ते उपचार देणेकामी तसेच शहरातील नागरिकांना याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी तातडीने हालचाल करणेकामी या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी.

वाघेरे यांच्याप्रमाणेच साने यांनीही प्रशासनाला व त्यातही वैद्यकीय विभागाच्या ढिसाळ कारभाराला याप्रश्नी जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, या आजाराला आळा घालण्यास प्रशासन अपुरे पडले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक हेवेदाव्यांमुळे वैद्यकीय या अत्यावश्यक सेवेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत जनजागृतीसह ठोस उपायांची गरज आहे. या आजारावरील लस व गोळ्यांचा तुटवडा आहे.

संबंधित लेख