मावळ, शिरुर : शिवसेनेचे एका तीरातून दोन निशाण; लोकसभेतून विधानसभेची व्यूहरचना

मावळ, शिरुर : शिवसेनेचे एका तीरातून दोन निशाण; लोकसभेतून विधानसभेची व्यूहरचना

पिंपरीः युती होवो अथवा राहो; शिवसेना लोकसभेच्या जोरदार तयारीला लागली आहे. त्याचा प्रत्यय त्यांचे उमेदवार जवळपास नक्की झालेल्या मावळ व शिरूरमध्ये येत आहे. 

मावळ जिल्हाप्रमुख म्हणून आज गजानन चिंचवडे यांची नेमणूक झाली. ते मावळचे पक्षाचे खासदार श्रीरग बारणे यांचे विश्वासू सरदार आहेत. शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख राम गावडे असून ते शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. चिंचवडे यांच्या नियुक्तीमागे विधानसभेचेही गणित दडलेले आहे.

बारणे यांचेच दुसरे विश्वासू शिलेदार योगेश बाबर यांची यापूर्वीच पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. उद्योगनगरीतील पिंपरी, चिंचवड हे दोन तर मावळ असे तीन घाटांवरील विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये येतात. त्याची जबाबदारी चिंचवडे यांना देऊन जिल्ह्याचे दुसरे प्रमुखपद त्यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामागे लोकसभेबरोबर विधानसभेचीही व्यूहरचना असल्याची शिवसेनेतच चर्चा आहे. 

युती झाली नाही, तर चिंचवडेसारख्या विश्वासू माणसाचा बारणेंना लोकसभेला फायदा होणार आहे. तर मावळचे मावळते शिवसेनाप्रमुख तथा जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांना मावळ विधानसभेची उमेदवारी मावळमधून देण्याकरिता त्यांना तयारीसाठी आतापासूनच त्यांच्या (जिल्हाप्रमुख) जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. दुसरीकडे विधानसभेला चिंचवडे हे चिंचवडमधून शिवसेनेचे उमेदवार युती झाली नाही,तर असू शकतात, अशी कुजबूज आताच सुरु झाली आहे. चिंचवडेंना दिलेल्या नव्या पदातून त्याला दुजोरा मिळतो आहे.

लोकसभेला शिवसेनेचे उमेदवार मावळमध्ये ठरले असले,तरी विधानसभेला चित्र वेगळेच असण्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. चिंचवडमधून नाव घेतले जात असलेल्या राहूल कलाटे यांचा पत्ता ऐनवेळी कापला जाऊ शकतो, असे संकेत चिंचवडेंच्या नियु्क्तीतून मिळाले आहेत. तर, पिंपरीतूनही युतीअभावी शिवसेनेचा उमेदवार हा आयात असू शकतो. 

भाजपमधून येणाऱ्या नगरसेविकेला शिवसेना हे तिकिट देऊ शकते, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. युती झाली, तर मात्र प्रबळ उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला ही संधी चिंचवडला मिळू शकते. पिंपरीत भाजपमधून उमेदवारीसाठी होणारे इनकमिंगही त्यामुळे होणार नाही. ऐनवेळी राजकारणात काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय विधानसभेला पिंपरी व चिंचवडमध्ये शिवसेनेच्या बाबतीत येण्याची चिन्हे सध्या, तरी दिसत आहेत. 

शहराचा समावेश असलेल्या शिरूर व मावळ या दोन लोकसभा मतदारसंघांचा विचार केला, तर लोकसभेनंतर विधानसभेला मावळमध्ये अधिक उलटसुलट घडामोडी घडतील, असा अंदाज आहे. त्याचे संकेत चिंचवडे यांच्या नियुक्तीतून मिळाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com