शिवसेना शाखेमुळे भाजप आणि शिवसेनेत वाद; अर्वाच्य भाषेतील भांडण गेले पोलिस ठाण्यावर

मुंबईतील शिवसेना शाखांत स्थानिक वाद मिटविले जातात. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही थोड्याफार फरकाने या शाखांत पोलिसांत जाणारी भांडणे सोडविली जातात. मात्र, या शाखेमुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद झाला आहे. एवढेच नाही, तर हे प्रकरण आता पोलिसांतही गेले आहे. त्यामुळे शहरभर हा चर्चेचा विषय झाला आहे.
शिवसेना शाखेमुळे भाजप आणि शिवसेनेत वाद; अर्वाच्य भाषेतील भांडण गेले पोलिस ठाण्यावर

पिंपरीः मुंबईतील शिवसेना शाखांत स्थानिक वाद मिटविले जातात. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही थोड्याफार फरकाने या शाखांत पोलिसांत जाणारी भांडणे सोडविली जातात. मात्र, या शाखेमुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद झाला आहे. एवढेच नाही, तर हे प्रकरण आता पोलिसांतही गेले आहे. त्यामुळे शहरभर हा चर्चेचा विषय झाला आहे. 

या प्रकरणातील भाजपच्या नगरसेविकेने शिवसेना पदाधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत केलेल्या शिवीगाळीची 22 मिनिटांची ऑडिओ टेप व्हायरल झाल्याने सोशल मिडियावरही त्याचा बोलबाला आहे. 

शिवसेनेचे पिंपरी विधानसभाप्रमुख जितेंद्र ननावरे आणि भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि नगरसेविका सीमा सावळे यांनी या शाखेवर दावा केला आहे. 35 वर्षाची ही जुनी शाखा शिवसेनेची आहे, असे ननावरे यांचे म्हणणे आहे. तर ती आमची वैयक्तिक मालमत्ता असल्याचे सावळे व कामतेकर यांचा दावा आहे. त्यातूनच 19 जुलै रोजी त्यांच्यात फोनवरून भांडण झाले. त्यात सावळे यांनी ननावरे यांना अर्वाच्य भाषा वापरली. त्याची ऑडिओ क्‍लीपच त्यांनी आज पत्रकारपरिषदेत सादर केली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटक सुलभा उबाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

ननावरे म्हणाले, "सुसंस्कृत, भाजपच्या नगरसेविकेचा, पदाधिकाऱ्याचा हा उच्छाद व उन्माद आहे. सावळे यांनी शिवीगाळ, तर कामतेकर यांनी आपल्याला धमकावले आहे. त्याबाबत पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे. कामतेकर यांच्यावर ऍट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी त्यात केली आहे. सावळे व कामतेकर यांच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला संरक्षण द्यावे. स्वच्छ भारत मोहीम राबविणाऱ्या भाजपने प्रथम आपल्या पक्षात ही मोहीम घेऊन या दोघांची हकालपट्टी करावी.'' 

याबाबत चौकशी करून कारवाई करू, असे तक्रार देण्यात आलेल्या पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी "सरकारनामा'ला सांगितले. 

दुसरीकडे कामतेकर व सावळे यांनी, `ही शाखा आपली मालमत्ता असून त्यातील सामानही आपलेच आहे,' असे सांगितले. त्यामुळे त्यात बेकायदेशीरपणे घुसल्याबद्दल ननावरे यांच्याविरुद्ध 19 तारखेलाच तक्रार दिल्याचे सांगितले. ननावरेंनी अश्‍लील वर्तन केल्यानेच त्यांना शिवीगाळ केल्याचे सावळे म्हणाल्या. 

दरम्यान, युती पदाधिकाऱ्यांच्या या वादामुळे पोलिसांनी ही शाखाच आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे ती परत मिळण्याची मागणी शिवसेनेचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख बाबर, महिला संघटक उबाळे यांनी पोलिसांकडे केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com