pimpri-chinchwad-reaction-against-burning-of-constitution | Sarkarnama

दिल्लीतील संविधान अवमानाचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये पडसाद 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 ऑगस्ट 2018

संविधान जाळल्याच्या दिल्लीतील घटनेचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये उमटत आहेत. या घटनेचा विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून धिक्कार करण्यात आला आहे. 

पिंपरीः संविधान जाळल्याच्या दिल्लीतील घटनेचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये उमटत आहेत. या घटनेचा विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून धिक्कार करण्यात आला आहे. 

या समाजकंटकांविरुद्ध राजद्रोह आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही केली गेली आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर म्हणून मनुस्मृतीची होळी करून संविधानाचे सामूहिक वाचन आज केले. 

9 ऑगस्टला जंतरमंतर मैदानावर मनुस्मृती विचारसरणीच्या व्यक्तींनी केलेल्या या कृत्याचे प्रथम सोशल मिडियावर टोकाच्या प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. 

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. त्यात व्हीजेएनटीचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, प्रवक्ते फजल शेख, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे तसेच विजय लोखंडे आदी सामील झाले होते. यावेळी दिल्लीत संविधानाचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. 

तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडने दिल्लीतील घटनेला प्रत्युत्तर म्हणून मनुस्मृतीची होळी केली. संविधानाचे सामूहिक वाचनही त्यांनी आंबेडकर स्मारकात केले. जिल्हाध्यक्ष सतीश काळे, शहराध्यक्ष सुधीर पुंडे आदींनी त्यात भाग घेतला. 

समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर पुतळ्यासमोरच एक दिवसीय लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले. तर, रयत विद्यार्थी विचार मंचने देशात अगोदरच गढूळ वातावरण असताना या घटनेने त्यात भर टाकल्याचे सांगितले. त्यांनी केलेल्या आंदोलनात याप्रकरणी ऍट्रोसिटीसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. सायंकाळी महात्मा फुले स्मारकात सर्वपक्षीय तसेच संस्था, संघटनांचीही याप्रकरणी निषेध सभा झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख