pimpri-chinchwad-rahul-jadhav-new-mayor | Sarkarnama

राजसाहेबांनी प्रथम नगरसेवकपदाची संधी दिल्यामुळे आज महापौर : राहुल जाधव

उत्तम कुटे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मनसेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा दुसरा महापौर आज झाला, असे म्हटले,तर वावगे ठरणार नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच संधी दिल्यामुळे पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि त्यामुळेच दुसऱ्यांदा भाजपकडून नगरसेवक होताच महापौरपदाची संधी मिळाली आहे,अशी प्रांजळ कबुली आज नवनिर्वाचित महापौर राहूल जाधव यांनी काल दिली होती. त्यामुळेच मनसेने महापौर निवडणुकीत भाग घेतला. त्याचवेळी झालेल्या उपमहापौर निवडणुकीत, मात्र ती तटस्थ राहिली. यामुळे मनसेच्या एकमेव नगरसेवकाने घेतलेली ही दुहेरी भुमिका आज चर्चेची ठरली.

पिंपरीः मनसेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा दुसरा महापौर आज झाला, असे म्हटले,तर वावगे ठरणार नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच संधी दिल्यामुळे पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि त्यामुळेच दुसऱ्यांदा भाजपकडून नगरसेवक होताच महापौरपदाची संधी मिळाली आहे,अशी प्रांजळ कबुली आज नवनिर्वाचित महापौर राहूल जाधव यांनी काल दिली होती. त्यामुळेच मनसेने महापौर निवडणुकीत भाग घेतला. त्याचवेळी झालेल्या उपमहापौर निवडणुकीत, मात्र ती तटस्थ राहिली. यामुळे मनसेच्या एकमेव नगरसेवकाने घेतलेली ही दुहेरी भुमिका आज चर्चेची ठरली.

उद्योगनगरीचे भाजपचे दुसरे महापौर म्हणून आज निवडुन आलेले जाधव हे पूर्वी मनसेत होते. गत टर्मला (2012) ते या पक्षाचे नगरसेवक होते. त्यावेळी राष्ट्रवादी सत्तेत होती. तर, भाजपसह मनसे विरोधी बाकावर. मनसेचा (चार) भाजपपेक्षा (तीन) एक नगरसेवक मागील वेळी जास्त होता. त्यावेळी मनसे, भाजपचा गट तयार होत होता. मात्र, त्यावेळी चिखले यांच्या भुमिकेमुळे तो झाला नाही. परिणामी जाधव यांची स्थायी अध्यक्षपदाची संधी हुकली. म्हणून यावेळी त्यांना मतदान केले, असे चिखले यांनी आज मतदानानंतर सांगितले. 

जातपात न पाहता राजसाहेबांनी प्रथम नगरसेवकपदाची संधी 2012 ला दिल्यानेच आज महापौर होत आहे, असे वक्तव्य करीत जाधव यांनी काल राज ठाकरे यांचे आभार मानले होते. या त्यांच्या विधानामुळेही त्यांना ते मूळचे मनसैनिक असल्याने मत दिले, असे चिखले म्हणाले. त्याचवेळी उपमहापौर निवडणुकीतील मतदानाला तटस्थ राहिलो, असे ते म्हणाले.

गेल्यावर्षी पालिका निवडणुकीपूर्वी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते दुसऱ्यांदा निवडून आले. महापौरपद ओबीसीसाठी राखीव होते. त्यामुळे दुसरी टर्म असल्याने त्यांना महापौर व्हायचे होते. पण त्यांचे नंतरचे गुरु व भोसरीचे अपक्ष आमदार आणि भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांनी आपले दुसरे शिष्यवजा मित्र नितीन काळजे यांना ती संधी दिली. दरम्यान, दुसऱ्या वर्षी जाधव हे स्थायी सदस्य झाले. त्यामुळे त्यांनी स्थायी अध्यक्षपदासाठी फिल्डींग लावली. मात्र, भोसरी मतदारसंघात असलेले हे पद ऐनवेळी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या धक्कातंत्राने त्यांच्या मतदारसंघात गेले. परिणामी जाधव यांनी स्थायीच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिला. त्यानंतर काळजे यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा महापौरपदासाठी दावेदारी सांगितली. यावेळी,मात्र महेशदादांनी सावधिगिरी बाळगीत आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न करीत मुख्यमंत्र्यांकडूनच हे पद पदरात पाडून घेतले आणि जाधव महापौर झाले.

जाधव यांना पालिकेच्या खजिन्याची चावी हाती (स्थायी समिती अध्यक्ष) घ्यायची होती,मात्र, त्यांना व्हावे लागले महापौर आणि भुषवावे लागले शहराचे पहिले नागरिक हे प्रतिष्ठेचे पद.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख