आमदार जगतापांचे आव्हान हा शुभशकूनच: खासदार बारणे

शिवसेनेच्या प्रवक्त्या व विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या वाढदिवशी जगताप यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि त्या पार्श्वभूमीवर नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या मुंबईतील निवासस्थानी बारणे व गोऱ्हे यांच्यात झालेल्या कथित वादानंतर काल (ता.19) जगताप यांनी बारणे यांच्यावर सडकून टीका करताना वरील आव्हान दिले होते. त्याचा बारणे यांनी आज खरपूस समाचार घेतला.
आमदार जगतापांचे आव्हान हा शुभशकूनच: खासदार बारणे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आगामी लोकसभा पुन्हा लढण्याचे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिलेले आव्हान बारणे यांनी आज (ता.20) स्वीकारले. हे उसने आव्हान शुभशकून असल्याची प्रतिक्रिया बारणे यांनी देत जगताप यांना लोकसभेसाठी प्रतिआव्हान दिले. यामुळे या मित्र पक्षातील खासदार, आमदारांचा कलगीतुरा चांगलाच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या व विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या वाढदिवशी जगताप यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि त्या पार्श्वभूमीवर नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या मुंबईतील निवासस्थानी बारणे व गोऱ्हे यांच्यात झालेल्या कथित वादानंतर काल (ता.19) जगताप यांनी बारणे यांच्यावर सडकून टीका करताना वरील आव्हान दिले होते. त्याचा बारणे यांनी आज खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ''2014 मध्येही त्यांनी बारणे उमेदवार असतील, तर मी लोकसभा लढणार असे आव्हान दिले होते. त्यावेळी मी विजयी झालो. त्यामुळे त्यांचे हे आव्हान माझ्यासाठी शुभशकुनचआहे. जनसंपर्क, सर्वसामान्यांच्या सुखदु:खांमध्ये धावून जाणारी प्रतिमा, लढाऊपणा, लोकसभेतील कामाचा चढता आलेख यामुळे जनता माझ्याशी जोडली आहे. म्हणून त्याचा धसका घेऊन लोकसभा निवडणुकीला सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी असताना जगताप उसने आव्हान देऊ लागले आहेत. त्यांनी स्वतःचा  इतिहास तपासूनच दुसऱ्यावर टीका करावी. कोणताही लोकप्रतिनिधी स्वतःच्या आव्हानावर विजयी होत नसतो तर जनतेच्या पाठींब्यावर विजय होतो. भाजपमुळे मुठभर मास अंगावर चढल्याने कदाचित कोणतेही कारण नसताना तसेच त्यांच्यावर टीका केली नसतानाही ते वल्गना करू लागले आहेत. तीन वर्षापूर्वीच भाजपमध्ये दाखल जगताप हे जणू केंद्र,राज्य व संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत मीच आणली, असा आव आणून ते ऊर बडवून घेत आहेत.''

बारणे पुढे म्हणाले, ''मी युतीचा खासदार आहे हे विसरलेलो नाही. परंतु, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा कालावधी जगताप विसरले आहेत. ती निवडणूक लढण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा देण्याचे नाटक करून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. शेकापच्या मतांवर डोळा ठेऊन त्या पक्षात प्रवेश केला. त्यांची उमेदवारी घेतली. साथीला मनसेचा पाठिंबा आणि राष्ट्रवादीची फौजही घेतली. तरी देखील पावणेदोन लाखांनी पराभव झाला. मरेपर्यंत शेकाप सोडणार नाही अशी शपथ घेतलेले जगताप पराभवानंतर लगेच राष्ट्रवादीच्या तंबूत गेले. नंतर 2014 ला विधानसभेला पराभव दिसू लागताच ते भाजपमध्ये दाखल झाले. तेथे ते मोदी लाटेत निवडून आले. माझ्या तीन वर्षाच्या लोकसभा कामकाजाचा लेखाजोखा केंद्र सरकारच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जगतापांनी विधानसभेमध्ये किती वेळा तोंड उघडले हे चिंचवडच्या जनतेला सांगावे. तोंड न उघडलेल्या आमदारामध्ये त्यांची चिंचवडच्या आमदाराची गणना होते, ही चिंचवडकरांसाठी लाजिरवाणी बाब आहे.

शिवसेना पक्षाच्या अंतर्गत बाबीत बोलण्याचा अधिकार जगतापांना नाही, असेही बारणे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ''२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मातोश्रीच्या पायऱ्या झिजावणाऱ्या जगतापांना शिवसेना नेत्यांनी थारा दिला नाही याचे भान त्यांनी ठेवावे. समाजवादी काँग्रेसमधून राजकीय प्रवास करून नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, मनसेचा पाठींबा, पुन्हा राष्ट्रवादी आणि मोदी लाटेत भाजप असा प्रवास करणारे जगताप यांनी मला पक्षनिष्ठा शिकवावी, हाच मोठा विनोद आहे. माझी बांधिलकी जनतेशी आहे त्यामुळे अशा व्यक्तिगत टीकेला मी भिक घालत नाही. मावळ लोकसभेच्या आम जनतेच्या आशीर्वादावर मी २०१९ ला पुन्हा लोकसभेत जाणार आहे त्याला कोणत्याही फालतू आव्हानाची गरज नाही. माझ्या विरोधात काढलेले पत्रक म्हणजे जगतापांचा बालिशपणा, सत्तेची व पैशाची मस्ती आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com