pimpri-chinchwad-politics-and-crime | Sarkarnama

राजकारणामुळे गुन्हेगारी बेबंद

उत्तम कुटे
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

पोलिस चौक्या हफ्तेवसुलीचे केंद्र बनल्याचा आरोप या अगोदर केलेले शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी त्यापुढे आणखी एक पाऊल टाकणारे विधान करण्याचे धाडस दाखविले. वाढत्या गुन्हेगारीस राजकीय नेतेही जबाबदार असल्याचा सनसनाटी जाहीर लेखी आरोप त्यांनी काल केला. तसेच या राजकीय गुन्हेगारीचा बीमोड करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यातून त्यांनी राजकारण व राजकीय पुढाऱ्यांनाच घरचा आहेर दिला.

पोलिस चौक्या हफ्तेवसुलीचे केंद्र बनल्याचा आरोप या अगोदर केलेले शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी त्यापुढे आणखी एक पाऊल टाकणारे विधान करण्याचे धाडस दाखविले. वाढत्या गुन्हेगारीस राजकीय नेतेही जबाबदार असल्याचा सनसनाटी जाहीर लेखी आरोप त्यांनी काल केला. तसेच या राजकीय गुन्हेगारीचा बीमोड करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यातून त्यांनी राजकारण व राजकीय पुढाऱ्यांनाच घरचा आहेर दिला. त्यातही राज्य व केंद्र सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेकडून भाजपला व त्यातही गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा धरचा आहेर समजला जात आहे. 

प्रसिद्धीमाध्यमे वा विरोधी पक्षीय खासदाराचे हे वक्तव्य नसल्याने ते सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पिंपरीतील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटून राजकीय गुन्हेगारीचा बीमोड करा, ही बारणे यांनी केलेली मागणी उद्योगनगरीपुरती मर्यादित नसून ती राज्यासह सर्व देशालाही लागू पडते आहे. कारण सर्वत्रच काहीअंशी का होईना गुन्हेगारीचे राजकियीकरण झालेले आहे, ही बाब नाकारून चालणार नाही. 

सिग्नल तोडला वा नो एंट्रीत घुसलेल्याविरुद्ध वाहतूक पोलिसाला तडफेने व निर्भीड कारवाईही करता येत नाही,हे सध्याचे पिंपरीतील चित्र आहे. लगेच एखादा नगरसेवक व आमदाराचा फोन येतो. माझा कार्यकर्ता आहे, सोडून द्या, असे सांगितले जाते. मग वाहतुकीचा अगोदरच बोजवारा उडालेल्या शहराला कशी वाहतूक शिस्त लागणार? हीच बाब इतर गुन्ह्याबाबतही लागू पडते. पोलिस ठाण्यात राजकीय हस्तेक्षेप वाढलेला आहे. त्यातून राजकीय गुन्हेगारी वाढली आहे, असे विधान बारणे यांना करावे लागले आहे. दुर्दैवाने ती वस्तुस्थिती आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे व्यक्ती म्हणून गुणी असले,तरी गृहमंत्री म्हणून फेल गेलेले आहेत. त्यांची या खात्यावर जरबच नाही.त्यामुळे पिंपरी-चिंचवड सोडा,तर राज्यभर गुन्हेगार मोकाट आहेत. नागपूर ही त्यांची होमसिटीही त्याला अपवाद नाही. 

मुख्यमंत्र्यांप्रमाणे पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभनही दुर्दैवी म्हणता येतील. ते प्रामाणिक आहेत. कार्यक्षम आहेत. मात्र, त्यांच्या कारकिर्दीत शहरात गुन्हेगारी उफाळली आहे. दीड महिन्यात तिने मोठी उचल खाल्ली आहे. त्यामुळे नवे पोलिस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारीला चाप बसेल,ही ,समजूत व अपेक्षा फोल ठरली आहे. गेल्या वीस दिवसात शहरात पाच लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यातील तीन,तर अतिशय गंभीर आहेत. त्याने पोलिसांचे धिंडवडेच निघाले आहेत. कारण या तीन प्रकारात चार अल्पवयीन मुली बळी पडल्या आहेत. नुसत्या बळीच पडल्या नसून त्यातील दोघींचा,तर बळीच गेला आहे. त्यातील एकीचा अत्याचारानंतर आरोपीने खून केला.तर दुसरी या सामूहिक अत्याचारामुळे बळी गेली. या तिघी अल्पवयीन नाहीत,तर त्यातील एक बालिकाच आहेत. दोघी शाळकरी मुली आहेत. चार, आठ आणि बारा अशी त्यांची वये आहेत. या अत्याचारांतून आरोपींची विकृतीचा समोर आली आहे. त्यामुळे त्यांना फाशीच देण्याची मागणी पुढे आली आहे. अशाप्रकारे राजकीय खतपाणी मिळाल्याने राजकीय गुन्हेगारी वाढते आहे. 

दुसरीकडे कायद्यातील पळवाटा, कायद्याच्या अमलबजावणीचा अभाव, पोलिसी कामातील वाढता राजकीय हस्तक्षेप यामुळे इतर गुन्हेगारीही वाढली आहे. न्यायालयात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र, वाढलेले नाही. त्यामुळे आरोपींना धाक राहिलेला नाही. त्याची परिणती गुन्हेगारी वाढली आहे. तिचा बीमोड करायचा असेल,तर प्रथम गुन्हेगारांचे व गुन्हेगारीचे राजकीयीकरण थांबले पाहिजे. पोलिस कामातील राजकीय हस्तेक्षप बंद झाला पाहिजे. तरच सर्वसामान्यांना अच्छे दिन येतील. नाहीतर, वाढत्या गुन्हेगारी व लैंगिक अत्याचाराने आहे,त्यापेक्षा बुरे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत.

संबंधित लेख