Pimpri chinchwad politics | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रोटोकॉलवरून   मानापमान : खासदार मोठे की आमदार मोठे !

उत्तम कुटे
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पिंपरी  :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा काही  तासांचा धावता दौरा करीत आहेत.त्यासाठी पोलिसांनी छापलेल्या  निमंत्रण पत्रिकेत खासदारांचे नाव आधी तर आमदारांचे नाव नंतर छापण्यात आले आहे . मात्र पिंपरी  महापालिकेने निमंत्रण पत्रिकेत खासदाराआधी आमदारांचे नाव घेतल्याने खासदार - आमदारांना मानापमान नाट्य रंगले आहे .  

पिंपरी  :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा काही  तासांचा धावता दौरा करीत आहेत.त्यासाठी पोलिसांनी छापलेल्या  निमंत्रण पत्रिकेत खासदारांचे नाव आधी तर आमदारांचे नाव नंतर छापण्यात आले आहे . मात्र पिंपरी  महापालिकेने निमंत्रण पत्रिकेत खासदाराआधी आमदारांचे नाव घेतल्याने खासदार - आमदारांना मानापमान नाट्य रंगले आहे .  

महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेबाबत वरिष्ठ खासदार आमदार उघडपणे बोलत नसले तरी खासदार नाराज असल्याचे समजते . त्यामुळे या  दौऱ्याअगोदर ही निमंत्रण  पत्रिकाच चर्चेचा विषय झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्याच्या (ता.12)  शहर दौऱ्यात पोलिसांनी निमंत्रणपत्रिकेत प्रोटोकॉल पाळला असला,तरी  दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याला तिलांजली दिल्याचे  दिसून आले आहे. खासदार हे आमदारांपेक्षा मोठे पद असूनही  पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत शहरातील आमदारांची नावे अगोदर व  खासदारांची नंतर टाकण्यात आली आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या  पहिल्यावहिल्या शहर दौऱ्याची चर्चा होण्याऐवजी त्यांच्या दौऱ्याच्या  निमंत्रण पत्रिकेवरूनच दौऱ्याअगोदर भाजपच्या लेखी आमदार हा  खासदारापेक्षा मोठा असल्याची उपरोधिक चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेनेच्या दोन खासदारांवर कुरघोडी करताना  राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहातील आपल्या  खासदारालाही या  मानापमान नाट्यात डावलण्यात आले आहे.त्यातून पिंपरी भाजपमध्ये  सर्व काही आलबेल नाही,याला दुजोरा मिळाला आहे.

पालिका निवडणुकीनंतर मुख्यमंत्री प्रथमच पिंपरीत पाच पालिका कामांची उदघाटने व भुमीपूजनासाठी शनिवारी येत आहेत.त्यात दिघी  व एमआयडीसी या दोन पोलिस ठाण्यांच्या इमारतींची उदघाटने  आहेत.त्याजोडीने पालिकेचे दोन ग्रेड सेपरेटर व एकानाट्यगृहाचे भुमीपूजनही आहे.त्यामुळे पालिका आणि पोलिस अशा दोघांनीही  त्याची निमंत्रणे छापली आहेत.पोलिसांनी त्यात लोकप्रतिनिधींच्या नावांचा प्रोटोकॉल पाळला आहे.

मुख्यमंत्री,कॅबिनेटमंत्री,राज्यमंत्री, महापौर,खासदार व नंतर  आमदारांची नावे त्यांनी दिली आहेत.तर, पिंपरी पालिकेच्या पत्रिकेत शहराचे शिवसेनेचे दोन्ही खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व  श्रीरंग बारणे यांच्या नावाअगोदर भाजपचे शहरातील दोन्ही आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांची नावे आहेत. एवढेच नाही,तर लोकसभेपेक्षा वरिष्ठ असलेल्या राज्यसभेतील अमर साबळे यांचीही हीच गत झाली आहे.

यासंदर्भात अधिक चौकशी केली असता पालिका प्रशासनानेही निमंत्रण पत्रिकेचा प्रोटोकॉल पाळून ती तयार केली होती.मात्र,त्यात नंतर बदल  करण्यात सांगण्यात आल्याने कार्य़क्रम एक व पत्रिका दोन अशी गत  झाल्याचे समजते.

संबंधित लेख