pimpri-chinchwad-police-commissionarate-starts-functioning-from-independence-day | Sarkarnama

स्वांतत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडला मिळणार स्वतंत्र पोलिस आयुक्तालय

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पिंपरी-चिंचवडच्या बहूप्रतिक्षीत पोलिस आयुक्तालयाचे स्वप्न अखेरीस तीन दिवसांनी प्रत्यक्ष साकार होणार आहे. स्वातंत्र्यदिनीच शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय मिळणार आहे. त्याचे औपचारिक उदघाटन होणार आहे. प्रत्यक्ष आयुक्तालय इमारतीचे उदघाटन,मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिवाळीत होण्याची शक्यता आहे. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवडच्या बहूप्रतिक्षीत पोलिस आयुक्तालयाचे स्वप्न अखेरीस तीन दिवसांनी प्रत्यक्ष साकार होणार आहे. स्वातंत्र्यदिनीच शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय मिळणार आहे. त्याचे औपचारिक उदघाटन होणार आहे. प्रत्यक्ष आयुक्तालय इमारतीचे उदघाटन,मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिवाळीत होण्याची शक्यता आहे. 

पुणे पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीणचे विभाजन करून या नव्या आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यात शहरातील दहा, तर ग्रामीणमधील पाच अशी 15 पोलिस ठाणी आहेत. गेल्या वर्षीच्या 15 ऑगस्टलाच खरं तर हे आयुक्तालय सुरु होणार होते. मात्र, त्यात अनेक विघ्ने आली. तांत्रिक अडचणी आल्या. परिणामी आयुक्तालय लांबणीवर पडले. दुसरीकडे शहरात गुन्हेगारीने उचल खाल्ली. परिणामी पुन्हा आयुक्तालय लवकर सुरु करण्यानेही सर्व थरातूनजोर धरला गेला. त्याला शहरातील लोकप्रतिनिधींची साथ मिळाली. त्यातून विलंबाने का होईना ते आता सुरु होत आहे. लोकांची मागणी लक्षात घेऊन येत्या बुधवारी (ता.15) ते सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी `सरकारनामा'ला दिली. 

आयुक्तालयाच्या इमारतीतील (पालिकेची शाळा) फर्निचरचे काम सुरु आहे. त्याला महिना लागेल. त्यामुळे पालिकेच्या दुसऱ्या इमारतीत (ऑटो क्लस्टर) व विद्यमान पोलिस उपायुक्त (परिमंडळ तीन) कार्यालयातून आयुक्तालयाचा गाडा हाकला जाणार आहे. आयुक्तालयाला आणखी दोन इमारतींची गरज आहे. त्या मिळाल्यानंतर पूर्ण क्षमतेने आयुक्तालय सुरु होईल. दरम्यान आय़ुक्तालयाला पालिकेने दिलेली इमारत सज्ज झाल्यानंतर तिचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

कार्यक्षम व प्रामाणिक अधिकाऱ्यांची नेमणूक या आयुक्तालयात करण्यात आल्याने ते वाढत्या गुन्हेगारीला आळा घालतील, अशा अपेक्षेत पिंपरी-चिंचवडकर आहेत. 
 

संबंधित लेख