pimpri-chinchwad-police-action-against-corporators | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडच्या दोन माजी महापौरांसह `राष्ट्रवादी'च्या डझनभर नगरसेवकांवर होणार कारवाई 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन माजी महिला महापौरांसह 11 नगरसेवकांविरुद्ध येत्या दोन दिवसांत पिंपरी पोलिसांची कारवाई होण्याची शक्यता आहे. पालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या केबिनमध्ये कोंडल्याचे प्रकरण त्यांना भोवणार आहे. एवढ्या संख्येने प्रथमच नगरसेवकांविरुद्ध पोलिसी कारवाई शहरात होणार आहे. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन माजी महिला महापौरांसह 11 नगरसेवकांविरुद्ध येत्या दोन दिवसांत पिंपरी पोलिसांची कारवाई होण्याची शक्यता आहे. पालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या केबिनमध्ये कोंडल्याचे प्रकरण त्यांना भोवणार आहे. एवढ्या संख्येने प्रथमच नगरसेवकांविरुद्ध पोलिसी कारवाई शहरात होणार आहे. 

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ व तो सुरळीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने शहराचे सह शहर अभियंता (पाणीपुरवठा) अयुबखान पठाण व प्रवीण लडकत आणि विशाल कांबळे या दोन कार्यकारी अभियंत्यांना दीड तास कोंडून ठेवले होते. पाणीपुरवठा विभाग कार्यालयाला त्यांनी टाळेच लावले होते. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली होती.

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 15 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.

याबाबत काल सायंकाळी पिंपरी पोलिसांनी बीपी अॅक्ट 135 नुसार गुन्हा दाखल केला. कोंडलेले अधिकारी वा पालिका प्रशासनाने याबाबत तक्रार दिली नव्हती. पोलिसच स्वत:हून या प्रकरणात फिर्यादी झाले आहेत. 

या गुन्ह्यातील पालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, अर्पणा डोके, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, समीर मासूळकर,मयुर कलाटे,सुलक्षणा धर, पोर्णिमा सोनवणे आदींना येत्या दोन दिवसांत ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करू, असे पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी आज `सरकारनामा'ला सांगितले. 

संबंधित लेख