pimpri-chinchwad-new-mayor-rahul-jadhav-deputy-mayor-sachin-chinchwade | Sarkarnama

पिंपरीच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव, तर उपमहापौरपदी भाजपचेच सचीन चिंचवडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव हे आज विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा दणदणीत मतांनी पराभव केला. तर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही याच पक्षाचे सचीन चिंचवडे यांनी बाजी मारली. त्यांनीही राष्ट्रवादीच्याच विनया तापकीर यांना पराभूत केले. जाधव हे शहराचे 25 वे, तर भाजपचे दुसरे महापौर आहेत. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव हे आज विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा दणदणीत मतांनी पराभव केला. तर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही याच पक्षाचे सचीन चिंचवडे यांनी बाजी मारली. त्यांनीही राष्ट्रवादीच्याच विनया तापकीर यांना पराभूत केले. जाधव हे शहराचे 25 वे, तर भाजपचे दुसरे महापौर आहेत. 

यानिमित्ताने महापौरपद सलग दुसऱ्यांदा समाविष्ट गावात गेले. तसेच ते भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकाकडेच कायम राहिले. अगोदरचे आणि भाजपचे पहिले महापौर हे चऱ्होलीतील होते, तर जाधव हे चिखलीतील आहेत. दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. 

उपमहापौरपद हे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप गटाकडे गेले. यापूर्वी ते जुन्या भाजपाई शैलजा मोरे यांच्याकडे होते. यामुळे आता महापौर व उपमहापौर अशा दोन्ही पदांवर पुरुषच विराजमान झाले आहेत. हे दोघेही भाजपचे शहराचे दुसरे महापौर व उपमहापौर आहेत.

महापौर नितीन काळजे यांचा राजीनामा घेतल्याने ही निवडणुक झाली. त्यासाठी महापालिकेच्या विशेष सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी कामकाज पाहिले. जाधव यांना 80 मते पडली. तर, राष्ट्रवादीचे नढे यांना 33 मते पडली. भाजपचे 3 नगरसेवक तर, राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक गैरहजर होते. अपक्ष पाच नगरसेवक आणि मनसेचे सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले. शिवसेना तटस्थ राहिली.

सभेचे कामकाज सुरू होताच पीठासीन अधिकारी गुंडे यांनी अर्जांची छाननी केली. त्यानंतर माघार घेण्यासाठी 15 मिनिटे वेळ दिला. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे मतदान घेण्यात आले.

राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे, डबू आसवानी आणि नगरसेविका सुलक्षणा धर अनुपस्थित होते. 

दरम्यान, महापौरपदी डावलले गेल्यामुळे भाजपचे शत्रुघ्न काटे, रवी लांडगे आणि तुषार कामठे हे सुद्धा गैरहजर होते. महापौरानंतर उपमहापौरपदासाठी निवडणुक झाली. त्यात भाजपचे चिंचवडे 47 मतांनी विजयी झाले. त्यांना 79 मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी तापकीर यांना 32 मते पडली. या निवडीला वरूणराजानेही हजेरी लावली. तत्पूर्वी विजयी जल्लोष झाला. त्यात काही पोती भंडाऱ्यांची उधळण झाली. त्यामुळे पालिका मुख्यालय परिसर पिवळाधमक झाला. या भंडाऱ्यावर पाऊस पडल्याने चिखल झाला. त्यावरून 11 दुचाकीस्वार घसरून पडले. त्यात काही पालिका कर्मचारीही होते. 

जाधव यांचे शिक्षण दहावी झालेले आहे. तर, अगोदरचे महापौर काळजे हे अकरावीपर्यंत शिकलेले होते. शेती व वर्कशॉपचा त्यांचा व्यवसाय आहे. पत्नी आणि दोन मुले त्यांना आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांनी पाच वर्षे रिक्षाही चालविलेली आहे. त्यामुळे रिक्षाचालक श्रीमंत पालिकेचे आता महापौर झालेले आहेत.
 

संबंधित लेख