pimpri-chinchwad-NCP-legislative-assembly-election | Sarkarnama

भोसरी आणि चिंचवडला `राष्ट्रवादी'च्या दोघांचा शड्डू; वाढदिवस जंगी करून विधानसभेचा बिगूल फुकला

उत्तम कुटे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

विधानसभेच्या मागील दोन टर्मला भोसरीमध्ये दुसऱ्यांना आमदार करण्यात मोठा वाटा असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व विद्यमान विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी 2019 ला स्वत:च आमदार व्हायचे ठरविले आहे. 

पिंपरीः विधानसभेच्या मागील दोन टर्मला भोसरीमध्ये दुसऱ्यांना आमदार करण्यात मोठा वाटा असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व विद्यमान विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी 2019 ला स्वत:च आमदार व्हायचे ठरविले आहे. 

अभी तो नही, तो कभी नही या इराद्यानेच त्यांनी तशी तयारीही सुरु केली आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवसानिमित्तच्या शक्तीप्रदर्शनातून नुकताच (ता.13) आला. याच पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त (ता.15) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत 2019 साठी चिंचवडमधून रणशिंग फुंकले. यानिमित्त दोघांच्या मतदारसंघात नव्हे,तर संपूर्ण शहरात लागलेल्या फ्लेक्सवर 2019 चे भावी आमदार असाच उल्लेख आहे.

भोसरी आणि चिंचवड या ठिकाणी सध्या भाजपचेच ( त्यात भोसरीचे महेश लांडगे हे सहयोगी) आमदार आहेत. तेथेच राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे. या दोन्ही ठिकाणी त्यांची ताकद आहे. विधानसभेची निवडणूक ही राज्यात लोकसभेबरोबर आणि ती सुद्धा मुदतपूर्व या वर्षअखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  तिची तयारी आताच शहरात सुरु झाली आहे.

नाना आणि काकांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या जोरदार शक्तीप्रदर्शनाने त्याला दुजोरा दिला आहे. त्यातही काका यावेळी आमदारकीसाठी चंगच बांधल्याचे दिसून येत आहे. जर, महेशदादा पुन्हा विधानसभेला उमेदवार असतील, तर त्यांना तोडीस तोड असा काकांसारखा आक्रमक चेहरा राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे हातातून गेलेली ही जागा पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा पक्ष विचार करेल, असा राजकीय जाणकारांचाही अंदाज आहे. त्यांनी 2009 ला भोसरीतून विलास लांडे यांना आमदार करण्यासाठी मोठी मदत केली आहे. तर गतवेळी असेच त्यांचे मोलाचे सहाय्य लाभल्याने अपक्ष असूनही लांडगे निवडून येण्यास मदत झाली. 

दोनवेळा दुसऱ्यांना आमदार करणाऱ्या काकांनी 2019 ला स्वत:च आमदार व्हायचे आता ठरविले आहे. त्यामुळे भोसरीत काट्याची टक्कर होणार आहे.

विधानसभेच्या उमेदवारीची पहिली पायरी म्हणून साने यांना त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ नुकतेच पलिकेतील विरोधी पक्षनेते देऊन पक्षाने दिले. त्यांचा अपवाद वगळता भोसरीतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक हे गेल्यावर्षी भाजपमध्ये गेले होते. तरीही मोदी लाटेत साने निवडून आले. मात्र, राष्ट्वादीची पालिकेतील 15 वर्षाची सत्ता गेली. योगेश बहल या सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवकाला विरोधी पक्षनेते करण्यात आले. मात्र, त्यांनी छाप न सोडल्याने त्यांच्याजागी साने यांना संधी देण्यात आली आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनीही आपल्या  वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केले.संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात त्यांचे ‘फ्लेक्स’झळकत आहेत. या फ्लेक्सवर ‘लक्ष्य 2019 चिंचवड विधानसभा’ असा मजकूर लिहिला आहे. वाढदिवसाचे निमित्त साधत नानांनी आगामी चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 2014 मध्ये हुकलेली संधी 2019 मध्ये खेचून आणण्यासाठी त्यांनी आत्तापासूनच प्रयत्न सुरु केले असल्याची जोरदार चर्चा आहे. संपूर्ण मतदारसंघाकडे अधिक लक्ष्य देण्यास सुरुवात करत विधानसभेची निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत नानांनी दिले आहेत.

पक्षाच्या पडत्या काळात देखील ते पक्षासोबत निष्ठावंतपणे राहिले आहेत. त्यामुळे जुन्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाना काटे यांची ताकद आहे. चिंचवडचे विद्यमान आमदार व भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासारखेच शक्तीमान असल्याने नानांना पुन्हा पक्ष संधी देईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे भोसरीसह चिंचवडचीही लढत यावेळी लक्षवेधी होणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख