Pimpri Chinchwad Mayor Selection Row | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड महापौरपदाचा तिढा वाढला : आता खान्देशपुत्राला पद देण्याची मागणी

उत्तम कुटे
सोमवार, 30 जुलै 2018

पिंपरी-चिंचवडचा महापौर माळी व कुणबी करा, अशी मागणी या दोन्ही समाजाकडून यापूर्वीच झाली आहे. त्यानंतर आता हे पद खान्देशपुत्राला देण्याची मागणी आज पुढे आली. त्यामुळे या पदाचा तिढा आणि रस्सीखेच आणखी वाढली आहे. त्यावर मराठा आरक्षण प्रश्नी गुरफटलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेणार आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा महापौर माळी व कुणबी करा, अशी मागणी या दोन्ही समाजाकडून यापूर्वीच झाली आहे. त्यानंतर आता हे पद खान्देशपुत्राला देण्याची मागणी आज पुढे आली. त्यामुळे या पदाचा तिढा आणि रस्सीखेच आणखी वाढली आहे. त्यावर मराठा आरक्षण प्रश्नी गुरफटलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आजच्या त्यांच्या या निर्णयाकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान कुणबी, माळी वादात ते मूळ भाजपाच्या असलेल्या कार्यकर्त्याच्या गळ्यात ही माळ घालून वादावर पडता टाकतील, असा तर्क आहे.

4 तारखेला महापौरपदाची निवडणुक आहे. त्यासाठी उद्याच अर्ज दाखल करायचा आहे. परिणामी आज या पदाच्या उमेदवाराचा निर्णय होणार आहे. त्यासाठी शहराचे कारभारी व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी कालच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी महापौरपद शत्रूघ्न काटे यांना देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तर, त्यापूर्वीच भोसरीतील आमदार समर्थक नगरसेवक आणि माळी समाजातील प्रतिनिधींनी महापौरपद ओबीसीसाठी राखीव असल्याने तेथे माळी नगरसेवकालाच संधी द्यावी, असा आग्रह पत्रकारपरिषद घेऊन एक दिवस अगोदरच केलेला आहे. त्याकरिता त्यांनी राहुल जाधव या नगरसेवकाचे नाव पुढे केले आहे.

शहरावर मराठी व माळी समाजाचे वर्चस्व आहे. त्यातूनच महापौर हा माळी की कुणबी हा आपला असावा, यासाठी वाद सुरु आहे. तो सुरु असतानाच त्यात आता शहरातील खान्देशवासियांनीही उडी घेतली आहे. त्यांनी खान्देशपुत्रालाच हे पद देण्याची मागणी उचलली आहे. ढाके हे एकनिष्ठ भाजपाई असल्याने त्यांना या पदावर बसविण्याचा आग्रह लेवा पाटीदार संघ, समता भ्रातू मंडळ आणि खान्देशातील विविध संघटनांनी धरला आहे.

सरकारनामा मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख