pimpri-chinchwad-eknath-pawar-nagpur-connection | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार `लकी'

उत्तम कुटे
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

सर्वांना संधी देण्याच्या हेतुने वर्षातच पालिका पदाधिकारी बदलाच्या भाजप धोरणाला पिंपरी-चिंचवडमध्ये सभागृहनेते एकनाथ पवार अपवाद ठरले आहेत. दीड वर्षानंतरही पद शाबूत राहिलेले पालिकेतील ते एकमेव पदाधिकारी आहेत.त्यामुळे त्यांना बदलण्याच्या हालचालीवर पक्षाने आता पडदा टाकल्यात जमा झाला आहे. लोकसभा निवडणुक पार पडेपर्यंत त्यांचे पद अबाधित राहणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

पिंपरीः सर्वांना संधी देण्याच्या हेतुने वर्षातच पालिका पदाधिकारी बदलाच्या भाजप धोरणाला पिंपरी-चिंचवडमध्ये सभागृहनेते एकनाथ पवार अपवाद ठरले आहेत. दीड वर्षानंतरही पद शाबूत राहिलेले पालिकेतील ते एकमेव पदाधिकारी आहेत.त्यामुळे त्यांना बदलण्याच्या हालचालीवर पक्षाने आता पडदा टाकल्यात जमा झाला आहे. लोकसभा निवडणुक पार पडेपर्यंत त्यांचे पद अबाधित राहणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

राष्ट्रवादीची 15 वर्षाची राजवट जाऊन गेल्यावर्षी भाजप पिंपरी-चिंचवड पालिकेत प्रथमच सत्तेत आली. 128 पैकी त्यांचे 77 नगरसेवक विजयी झाले. त्या प्रत्येकाला पद देऊन पुन्हा 2022 मध्ये सत्तेत राहण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांनी प्रभागाध्यक्ष ते महापौर पदापर्यंत सर्व पदाधिकारी वर्षभरातच बदलले. त्याला पवार एकमेव अपवाद राहिलेले आहेत. त्यांचे डबल नागपूर कनेक्शन कामी आल्याची चर्चा आहे. त्यासाठी ते गडकरी वाड्यावर व फडणवीसांच्या गढीवरही गेले होते. गडकरींच्या आग्रहामुळे त्यांचे पद टिकल्याचे समजते.

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीचे कारण त्यासाठी पुढे केले गेले आहे. या निवडणुकीसाठी पालिकेत विश्वासू व जुना भाजपाई मुख्य पदावर असावा, अशी सबब पवार बदलाची मागणी करणाऱ्यांना सांगण्यात आली आहे. या निवडणुकीत युती झाली नाही,तर पक्षाचे शहरातील दोन्ही आमदार (चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप व भोसरीचे सहयोगी सदस्य महेशदादा लांडगे) हे लोकसभेचे मावळ व शिरूरचे उमेदवार असणार आहेत. त्यावेळी त्यांच्या प्रचाराला पॉवर पुरविण्याचे काम पवार यांना करावे लागणार आहे. या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. तेथे कमळ फुलविण्याचा भाजपचा मनसुबा आहे. 

जुने व एकनिष्ठ भाजपाई असलेले पवार यांना बदलण्याचा नव्या भाजपाई गटाचा प्रयत्न होता व आहे. मात्र, त्यांच्याशी पवार यांनी जूळवून घेतले आहे. त्याचवेळी त्यांचे नागपूरशीही संधान आहे. त्यातून त्यांचे पद अबाधित राहिले आहे. मात्र, डावलले गेलेले व या पदावर डोळा असलेले पक्षाचे नगरसेवक त्यामुळे नाराज असल्याचे कळते.

संबंधित लेख