pimpri-chinchwad-corporation-bjp-on-backfoot | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपला घरचा आहेर

उत्तम कुटे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड बसविणाऱ्या जादा दराच्या निविदा रद्द करून त्या पुन्हा काढण्याची मागणी विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस वा शिवसेनेने केली नसून ती सत्ताधारी भाजप नगरसेवकानीच शनिवारी केली. त्यामुळे भाजपला हा घरचा आहेर मिळाला आहे. यापूर्वीही भाजपच्याच दुसऱ्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने स्मार्टसिटीच्या निविदेतही अशीच शंका उपस्थित करून त्याप्रकरणीही फेरनिविदा काढण्याची मागणी केलेली आहे.

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड बसविणाऱ्या जादा दराच्या निविदा रद्द करून त्या पुन्हा काढण्याची मागणी विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस वा शिवसेनेने केली नसून ती सत्ताधारी भाजप नगरसेवकानीच शनिवारी केली. त्यामुळे भाजपला हा घरचा आहेर मिळाला आहे. यापूर्वीही भाजपच्याच दुसऱ्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने स्मार्टसिटीच्या निविदेतही अशीच शंका उपस्थित करून त्याप्रकरणीही फेरनिविदा काढण्याची मागणी केलेली आहे.

स्मार्ट सिटीच्या अडीचशे कोटी रुपयांच्या पहिल्याच निविदेवर शंका उपस्थित करून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शत्रूघ्न काटे यांनी या कामाची फेरनिविदा काढण्याची मागणी याअगोदरच केलेली आहे. तर, आज विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी, तर स्मार्टच्या या पहिल्या निविदेत रिंगच झाल्याचा आरोप केला. त्यांनीही ही निविदा रद्द करून ती पुन्हा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली. अन्यथा राष्ट्रवादी तीव्र आंदोलन करील वा न्यायालयातही जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. काटे यांनी पहिला आहेर दिल्यानंतर शनिवारी भाजपला दुसरा आहेर पक्षाचे दुसरे नगरसेवक तुषार कामठे यांनी दिला. त्यांनी दोन ग्रेड सेपरेटरच्या कामाच्या निविदा जादा दराने काढल्याने पालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याची तक्रार पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली. त्यामुळे 33 कोटी रुपयांच्या या दोन्ही कामाच्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. शहर भाजपला घरचा आहेर देणारे हे दोन्ही नगरसेवक शहराचे कारभारी आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक असून त्यांच्या चिंचवड मतदारसंघातील आहेत. 

कामठे निवेदनात म्हणतात, की महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये ठिकठिकाणी प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर आणि इतर कामे केली जातात. या कामांच्या निविदेचे दर महानगरपालिकेच्या संबधित विभागातील अधिका-यांमार्फत निश्चित केले जातात. त्याआधारे निविदा प्रक्रिया राबवून कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या निविदाधारकाकडून काम करून घेतले जाते. परंतु,मागील काही महिन्यांपासून अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने ज्यादा दराच्या निविदा भरल्या जात आहेत. या प्रकारांमुळे महानगरपालिकेचे पर्यायाने शहरातील करदात्या नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.  ही बाब नुकतीच स्थापत्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरून निदर्शनास आली आहे. 

या विभागामार्फत डांगे चौक व काळेवाडी फाटा येथे ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु, या कामासाठी संबधित ठेकेदाराने निविदा दरापेक्षा मोठ्या प्रमाणात ज्यादा दराने निविदा भरल्या आहेत. ज्यादा दराने आलेल्या निविदांमुळे कोट्यवधी रुपयांचा अर्थिक भुर्दंड महानगरपालिकेला सोसावा लागणार आहे. तरी ज्यादा दराने आल्याने अशा कामांमध्ये संबधित अधिकारी व ठेकेदार संगनमंताने निविदाप्रक्रिया राबवित असल्याचा संशय येतो. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया राबविणा-या संबधित स्थापत्य विभागातील सर्व अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करावी.
 

संबंधित लेख