Pimpri chinchwad BJP cornered on ring road issue | Sarkarnama

पिंपरी चिंचवड महापालिका : रिंग रोडच्या मुद्द्यावर भाजपाची सर्व पक्षीय कोंडी

उत्तम कुटे : सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 11 जुलै 2017

पिंपरीःशास्तीकर माफी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर रिंगरोड बाधितप्रश्‍नावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या नवख्या भाजपची अनुभवी राष्ट्रवादीसह सर्वच विरोधकांनी कोंडी करण्याची हॅटट्रिक केली आहे.

पिंपरीःशास्तीकर माफी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर रिंगरोड बाधितप्रश्‍नावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या नवख्या भाजपची अनुभवी राष्ट्रवादीसह सर्वच विरोधकांनी कोंडी करण्याची हॅटट्रिक केली आहे.

 मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही सर्वपक्षीय विरोधकांनी एकजुटीने आणि एकमताने रिंगरोडला तीव्र विरोध केल्याने आता हा प्रकल्प अडचणीत आला आहे.रिंगरोडचा मार्ग बदला आणि ते शक्‍य नसेल,तर तो रद्दच करा,अशी मागणी करीत संघर्ष समितीने याप्रश्‍नी छेडलेल्या आंदोलनात विरोधातील सर्व पक्षांनी उडी घेतली. यामुळे सत्ताधारी पेचात सापडले आहेत. 

 पाडापाडीच्या प्रश्‍नावरून पूर्वीच्या सत्ताधारी राष्ट्रवादीला विरोध करणाऱ्या भाजपवरच हा विरोध झेलण्याची पाळी आता आली असून पूर्वी तो झेलणारा राष्ट्रवादी तो करीत आहे,हे विशेष. त्यात आता विरोधी बाकावरील सर्वपक्षीयांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने ते आता पेटणार अशी चिन्हे आहेत. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व पालिकेतील सभागृहनेते एकनाथ पवार यांना रविवारी रिंगरोडबाधितांचा चढलेला पारा पाहून काढता पाय घ्यावा लागला होता. 

मागच्या पंचवार्षिकमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षाचे अस्तित्व असून नसल्यासारखेच होते. त्यामुळे राष्ट्रवादीने पाशवी बहुमताच्या जोरावर रेटून कारभार केला.परिणामी त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागला. एवढेच नाही,तर त्यातून त्यांची सत्ताही चार महिन्यापूर्वी गेली आणि मोदी लाटेमुळे भाजप सत्तेत आली.मात्र, ते तसेच त्यांचे नगरसेवकही नवे असल्याने अनुभवी नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने पहिल्या दिवसापासून त्यांची कोंडी करण्यास सुरवात केली आहे. 

त्याचा प्रत्यय पालिकेच्या पहिल्याच मासिक सभेत आला.सरसकट शास्तीकर माफीसाठी सभागृहात गोंधळ केल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते आणि इतर तीन विरोधी नगरसेवकांचे निलंबन घिसाडघाईने करण्यात आले.नंतर ते मागे घेण्यात आले. नंतर शेतकरी कर्ज माफीवरून पुन्हा सर्व विरोधक एकवटले. 

रिंगरोडमुळे पिंपरी-चिंचवड नवगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अडीच हजार घरांवर बुलडोझर फिरविण्याची तयारी प्रशासनाने केली असून काही ठिकाणी पाडापाडीही सुरू करण्यात आली आहे.त्याला विरोध करण्यासाठी बाधितांनी स्वयंस्फूर्तीने  संघर्ष समिती स्थापन करीत आंदोलन छेडले आहे. त्याला आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे,शेकाप, भारिप बहुजन महासंघ या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला.एवढेच नव्हे,तर या आंदोलनात उडीही घेतली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची इकडे आड,तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. 

शहरातील एक वीटही पाडणार नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनाची आठवण यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी करून दिली.त्यामुळे रिंगरोडमध्ये बदल करण्याची मागणी त्यांनी केली.

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रिंगरोडचा सरकारने पुनर्विचार करावा,असे सांगितले.तर, वेळप्रसंगी किंमत मोजून बाधितांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी दिला आहे. तर, विकासाला विरोध नसल्याचे सांगत तो विश्‍वासात न घेता करण्यात आलेल्या पाडापाडीला असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले. 

संबंधित लेख