pimpri-bjp-shivsena-Dussehra | Sarkarnama

भाजपच्या आश्वासनाचा रावण राष्ट्रवादीने बनवला; शिवसेनेने दहन केला 

उत्तम कुटे
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

केंद्र व राज्य सरकारच्या आश्वासनांच्या गाजरांच्या रावणाचे दहन पिंपरी-चिंचवडमध्ये विजयादशमीला राष्ट्रवादीकडून करण्यात आले. शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी रावण  पेटविला. यामुळे राष्ट्रवादीच्या तयार केलेल्या भाजपच्या `रावणा'चे शिवसेनेकडून झालेले दहन शहरात चर्चेचे ठरले.

पिंपरीः केंद्र व राज्य सरकारच्या आश्वासनांच्या गाजरांच्या रावणाचे दहन पिंपरी-चिंचवडमध्ये विजयादशमीला राष्ट्रवादीकडून करण्यात आले. शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी रावण  पेटविला. यामुळे राष्ट्रवादीच्या तयार केलेल्या भाजपच्या `रावणा'चे शिवसेनेकडून झालेले दहन शहरात चर्चेचे ठरले.

भोसरीतून विधानसभेची राष्ट्रवादीकडून तयारी करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दसऱ्यानिमित्त पुन्हा शक्तीप्रदर्शन केले. यावेळी लोकसभेचे या पक्षाचे इच्छूक विलास लांडे हे सुद्धा उपस्थित होते.

राजकारणापलिकडील साने यांची कोल्हे यांच्याशी असलेली मैत्री व धर्मरक्षक संभाजी मालिकेवरील त्यांच्या प्रेमातून कोल्हे हे साने यांच्या चिखली प्रभागातील या चाळीस फूटी रावणाच्या दहनाला उपस्थित राहिले. यावेळी भोसरीचे राजकारण चिखलीतूनच फिरते, याचाही उल्लेख त्यांनी हजारो उपस्थितांसमोर केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा बिगूलच यानिमित्ताने या दोन्ही निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या इच्छूकांनी वाजविल्याची चर्चा या रावण दहनानंतर रंगली. 

अनधिकृत बांधकामे, कचरा, शास्तीकर, पाणी, रस्त्यावरील खड्डे या पालिका व राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रश्नांसह पेट्रोल, डिझेल व गॅसचे वाढते भाव याविषयीचे फलक रावणाच्या गळ्यात बांधण्यात आले होते. दहा तोंडाच्या या रावणाच्या अंगावर दहा आश्वासनांच्या गाजराचे हे फलक लक्ष वेधून घेत होते. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन भाजपच्या दोन्ही सरकारांनी देऊनही जनतेला गाजरच मिळाले याकडेही त्याव्दारे लक्ष वेधण्यात आले होते. 

संबंधित लेख