pimpri-bjp-samvad-yatra | Sarkarnama

2019 च्या विजयासाठी भाजपचा भर युवक व महात्मा गांधींवर

उत्तम कुटे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

2019 ला केंद्रात व राज्यात स्वबळावर सत्तेत येण्यासाठी भाजपने युवक आणि महात्मा गांधी यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. पुढील चार महिन्यांत महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद यात्रेतून ते युवकांना लक्ष्य करणार आहेत. तसा निर्णय मंगळवारी (ता.9) मुंबईत पक्षाच्या राज्यातील खासदार, आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला.

पिंपरीः 2019 ला केंद्रात व राज्यात स्वबळावर सत्तेत येण्यासाठी भाजपने युवक आणि महात्मा गांधी यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. पुढील चार महिन्यांत महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद यात्रेतून ते युवकांना लक्ष्य करणार आहेत. तसा निर्णय मंगळवारी (ता.9) मुंबईत पक्षाच्या राज्यातील खासदार, आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, हे चार महिन्याचे शेड्यूल पाहता राज्यात लोकसभेची मुदतपूर्व निवडणुक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता कमी झाल्याचे दिसते आहे.

भाजपच्या दादर (पूर्व) मुंबई येथील कार्यालयात ही आढावा बैठक झाली. त्याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे हे सुद्धा या बैठकीला हजर होते. ती अडीच तास चालली. त्याविषयी पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी सरकारनामाला माहिती दिली.

गांधीजयंतीपासून भाजपने ही यात्रा राज्यभर सुरु झाली आहे. ती गांधी पुण्यतिथीपर्यंत म्हणजे येत्या 30 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत प्रत्येक पक्षाच्या आमदाराला दीडशे किलोमीटरची यात्रा आपल्या मतदारसंघात काढायची आहे. त्यात खासदारांनी सामील व्हायचे आहे. अशा रितीने एकेक खासदार नऊशे किलोमीटर यात्रेत सामील होणार आहेत. या यात्रेत केंद्र व राज्याच्या योजना व कामे मतदारांपर्यंत पोचविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच यात्रेत स्वच्छताही केली जाणार आहे. तर या चार महिन्यात युवकांसाठी कबड्डी,खो-खो, अशा 17 खेळांच्या स्पर्धाही भरविण्याचा आमदारांना आदेश देण्यात आला आहे. 

पुणे जिल्ह्यातील आमदारांनी ही यात्रा सुरु केली असून, स्पर्धा मात्र या 30 तारखेपासून सुरु होतील, असे भेगडे यांनी सांगितले. स्पर्धा संयोजनाची जबाबदारी पुण्यातील आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
 

संबंधित लेख