पिंपरी विधानसभा मतदारसंघात पेच; भाजप, आरपीआय दोघांकडून तयारी 

राज्यात लोकसभेबरोबर विधानसभेचीही मुदतपूर्व निवडणूक होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे लोकसभेबरोबरच विधानसभेचे इच्छुकही आतापासूनच तयारीला लागले आहेत. मात्र,त्यातून पिंपरीत तूर्त पेच निर्माण झाला आहे. येथे भाजप व "आरपीआय'(आठवले गट) अशा युतीतील दोघांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात पेच; भाजप, आरपीआय दोघांकडून तयारी 

पिंपरीः राज्यात लोकसभेबरोबर विधानसभेचीही मुदतपूर्व निवडणूक होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे लोकसभेबरोबरच विधानसभेचे इच्छुकही आतापासूनच तयारीला लागले आहेत. मात्र,त्यातून पिंपरीत तूर्त पेच निर्माण झाला आहे. येथे भाजप व "आरपीआय'(आठवले गट) अशा युतीतील दोघांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. 

2009 पर्यंत हवेली हा राज्यात सर्वांत मोठा विधानसभा मतदारसंघ होता. त्याचे त्याच वर्षी विभाजन झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ त्यामुळे अस्तित्वात आले. त्यातील पिंपरी हा राखीव आहे. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे या मतदारसंघाचे पहिले आमदार. त्यानंतर गेल्या वेळी 2014 मध्ये तेथून शिवसेनेचे ऍड. गौतम चाबुकस्वार निवडून आले. 2014 ला लोकसभेला असलेली शिवसेना, भाजप युती विधानसभेला तुटली. मात्र, आरपीआय आणि भाजपची कायम राहिली. त्यात ही जागा "आरपीआय'ला गेली. तेथून चंद्रकांता सोनकांबळे यांनी चांगली लढत दिली. तिसऱ्या क्रमांकांची मते त्यांना मिळाली. 

राज्यात आरपीआयच्या उमेदवारांत त्यांना मिळालेली मते सर्वाधिक होती. ऍड. चाबुकस्वार हे निसटत्या मताधिक्‍याने विजयी झाले. त्यांचे मताधिक्‍य हे नोटा मतांपेक्षाही कमी होते. सोनकांबळे या शिलाई मशिनऐवजी कमळ हे भाजपचे निवडणूक चिन्ह घेऊन लढल्या असत्या, तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते. 

शिवसेना, भाजप युती यावेळी तुटली आहे. त्यामुळे "आरपीआय'बरोबरची युती भाजप टिकविण्याची शक्‍यता आहे. त्यातून पिंपरी हा मतदारसंघ "आरपीआय'च्या वाट्याला जाऊ शकतो. त्यामुळे तेथून पुन्हा सोनकांबळे यांनी जोरात तयारी सुरू केली आहे.भाजपनेही येथून लढण्याची तयारी सुरू आहे. त्यांच्यावतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यामुळेच त्यांनी शहरभर स्थायीच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका लावला आहे. 

शहरनिवासी भाजपचे खासदार अमर साबळे यांची कन्या वेणू यांचेही नाव पुढे आलेले आहे. खासदार साबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटचे समजले जातात. राज्य मंत्रिमंडळातील महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. त्यातून त्यांच्या कन्येला ही जागा मिळण्याची शक्‍यता अधिक आहे. 

कमळ चिन्हाचा अभाव, रामदास आठवलेंची न झालेली सभा यामुळे गतवेळी निसटता पराभव झाला. ती कसर यावेळी भरून काढणार आहे, असे सांगत सोनकांबळेंनी आगामी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे केल्याचे सांगितले. शिवसेना आमदारांनी समाजाची तसेच जी कामे करायला पाहिजे होती, ती केली नाहीत, असे सांगत त्यांनी विद्यमान आमदार ऍड. चाबूकस्वारांना आतापासूनच लक्ष्य करण्यास सुरवातही केली. आरपीआयला ही जागा दिली नाही, तर येथून भाजपही निवडून येणार नाही, असे त्या म्हणाल्या. 

नेहमीसारखा निवडणुकीपूर्वी पिंपरीतही सर्व्हे होईल. त्यात भाजप निवडून येईल, असा कल दिसला, तर पक्ष तेथून लढेल, असे शहर भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. यदाकदाचित लोकसभा निवडणूक अगोदर झाली. त्यात पिंपरीचा समावेश असलेल्या मावळमधून भाजपचा उमेदवार निवडून आला, तर या जागेवरील पक्षाचा क्‍लेम आणखी घट्ट होईल, असेही तो म्हणाला. त्यामुळे युती होणारे हे दोन्ही पक्ष तयारीत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून दरवेळी विनापेच होणाऱ्या पिंपरीत सध्या पेच आहे. परिणामी पिंपरीची लढत यावेळी लक्षवेधी ठरणार, अशीच चिन्हे आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com