PIMPARI-YOGESH-BAHAL | Sarkarnama

राजीनाम्याअगोदरच योगेश बहल यांची पिंपरीच्या विरोधी पक्षनेतेपदावरून एक्‍झिट 

उत्तम कुटे
बुधवार, 7 मार्च 2018

विरोधी पक्षनेत्याची भूमिका समर्थपणे पार न पाडल्याचा आरोप पक्षातूनच झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर योगेश बहल यांनी या पदावरून एक्‍झिट घेतल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे.

पिंपरी : विरोधी पक्षनेत्याची भूमिका समर्थपणे पार न पाडल्याचा आरोप पक्षातूनच झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर योगेश बहल यांनी या पदावरून एक्‍झिट घेतल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्यांनी गेल्या महिन्यात दिलेला राजीनामा अजितदादा पवार यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. मात्र, तेव्हापासून त्यांनी पालिकेतील आपल्या दालनात येणेच थांबविले आहे. दुसरीकडे या पदाचे दावेदार नाना काटे आणि दत्ता साने यांचा तेथे वावर वाढला आहे. त्यामुळे या महिन्यात नव्याने होणाऱ्या विरोधी पक्षनेतेपदी या दोघांपैकी एकाची निवड होणार अशीच अटकळ बांधली जात आहे. 

अत्यंत महत्त्वाच्या अशा पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीच्या वेळीही बहल पालिकेत फिरकले नाहीत. तसेच गेल्या शनिवारीही (ता.3) या पदासाठी पक्षातर्फे मोरेश्‍वर भोंडवे यांनी उमेदवारी दाखल केली, तेव्हाही ते अनुपस्थित होते. दोन्ही वेळची त्यांची गैरहजेरी चांगलीच खटकली. दुसरीकडे पक्षाचे इतर पदाधिकारी,मात्र दोन्ही प्रसंगी हजर होते. पदावरून हटविण्याची मागणी पक्षातूनच पुढे आल्याने बहल नाराज झाले आहेत. त्यातूनच त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला आहे. 

दरवर्षाला विरोधी पक्षनेते बदलला जाणार असल्याची सबब राष्ट्रवादी पुढे करणार असा अंदाज आहे. येत्या 22 तारखेला नवीन विरोधी पक्षनेता निवडला जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी आक्रमक दत्ताकाका साने, तर नेमका त्यांच्याविरुद्ध स्वभाव असलेले नाना काटे यांची नावे चर्चेत आहेत, हे दोघेही ज्येष्ठ नगरसेवक आहेत. शनिवारी आणि आज हे दोघेही पालिकेत आणि विरोधी पक्षनेते यांच्या दालनात आवर्जून उपस्थित होते. आता वरचेवर येथे येणार असून सत्ताधारी भाजपचा गैरकारभार उजेडात आणणार असल्याचे साने यांनी सांगितले. विरोधी पक्षनेता बदलणार असल्याचे संकेत गेल्या महिन्यातच पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांनीच दिले आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) महिला राष्ट्रवादीची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यावेळीही शहराध्यक्ष, महिलाध्यक्षा, सरचिटणीस असे पदाधिकारी उपस्थित होते. अपवाद होता, तो फक्त बहल यांचा. यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून नव्हे,तर माजी पदाधिकारी आणि नगरसेवक म्हणून, तरी यावेळी उपस्थित राहणे गरजेचे होते, अशी कुजबूज उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांत होती. तर,आपल्या एका जवळच्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी आज पुण्याला गेलो होतो, असे बहल म्हणाले. तसेच पालिकेतील भाजपच्या हुकूमशाही आणि दडपशाहीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी म्हणून स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पक्षाने लढविली, असेही ते म्हणाले.
 

संबंधित लेख