पिंपरी पालिकेचा व्हिडिओ शुटींगवर लाखो रुपयांचा चुराडा

वायफळखर्चाला कात्री लावून बचत करण्याचा कारभाऱ्यांचा आदेश डावलून पिंपरी-चिंचवड पालिकेची नाहक उधळपट्टी सुरुच आहे.
पिंपरी पालिकेचा व्हिडिओ शुटींगवर लाखो रुपयांचा चुराडा

पिंपरीः वायफळ खर्चाला कात्री लावून बचत करण्याचा कारभाऱ्यांचा आदेश डावलून पिंपरी-चिंचवड पालिकेची नाहक उधळपट्टी सुरुच आहे. विविध सभासमारंभाच्या व्हिडिओ शुटींगसाठी सहा लाख, तर एलईडी स्क्रीनकरिता सात लाख रुपये असे 13 लाख रुपये पालिका एका वर्षात खर्चणार आहे. तत्पूर्वी नुकताच सभागृहनेत्यांच्या दालनातील सोफे बदलण्यासाठीही मोठा खर्च झाला आहे. त्यापेक्षा या सोफ्यांचे अगोदरचे पांढऱ्या रंगाचे अभ्रे बदलून ते भगवे करण्यात आल्याने ते अधिक चर्चेचा विषय झाले आहेत.

आपल्या निवडणूक चिन्हातील भगवा आणि हिरव्या रंगाचा भाजप खुबीने वापर करीत आहेत. प्रथम त्यांनी तो आपल्या पदाधिकाऱ्यांच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा लावण्यासाठी केला. नंतर त्यांच्या टेबलावर या दोन रंगातच काचेच्या नेमप्लेट लावण्यात आल्या. मात्र, त्या एका ठेकेदाराने फ्रीमध्ये प्रसिद्धीसाठी दिल्याचे सांगण्यात आले. नंतर पदाधिकाऱ्यांची व्हिजीटिंग कार्डही याच रंगात छापण्यात आली. त्यावर विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने उपरोधिक प्रतिक्रिया दिली. मलाही त्यांनी भाजपमध्ये घेतले, असे ते म्हणाले.

दरम्यान, सोफे खराब झाल्याने ते बदलण्यात आल्याचे स्पष्टिकरण सभागृहनेते एकनाथ पवार यांनी दिले आहे. तसेच आपल्या पसंतीचा रंग त्याला दिल्याचे ते म्हणाले. तर, व्हिजीटिंग कार्डचे प्रूफ साने यांना दाखविले होते.त्यामुळे ती छापण्यापूर्वीच त्यांनी त्याला आक्षेप घ्यायला हवा होता, असे पवार म्हणाले.

गेल्यावर्षी भाजप पिंपरी पालिकेत प्रथमच सत्तेत आली. मात्र,त्यांचा कारभार व त्यातही स्थायीचे निर्णय पहिल्याच वर्षी टीकेचे लक्ष्य झाले. त्यामुळे दुसऱ्या वर्षी कारभाऱ्यांनी पालिकेची सूत्रे आपल्या हातात घेतली. निमंत्रणपत्रिका न छापण्याचा चांगला निर्णय त्यांनी खर्चबचतीसाठी घेतला. तसेच जयंती,पुण्यतिथीसह इतर कार्यक्रमासाठी मंडप उभारणी न करता ते पालिकेच्या नाट्यगृहात घेण्यास त्यांनी सांगितले. मात्र,त्याची पूर्ण अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. 

महोत्सव, सत्कार, पवनाथडी जत्रा, स्वरसागर संगीत महोत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओ शुटिंग पालिका करीत आहे. त्यावर वर्षाला काही लाख रुपये खर्ची पडत आहेत.येत्या वर्षभरासाठी त्यासाठी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. व्हिडिओ शुटींगच्या पहिल्या तासासाठी अठराशे, तर नंतरच्या प्रत्येक तासाला मंजुरी देण्याचा विषय उद्याच्या स्थायी समितीच्या बैठकीच्या नऊशे रुपये ठेकेदाराला मोजण्यात येणार आहे. तर, कार्यक्रमासाठी लावण्यात येणाऱ्या एलईडी स्क्रीनवरही पालिका येत्या वर्षभरात सात लाख खर्च करणार आहे. हा विषयही मंजुरीसाठी उद्या स्थायीसमोर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com