वडगाव नगरपंचायत निकालानंतर `राष्ट्रवादी'च्या आशा पल्लवित 

नवनिर्मित वडगाव कातवी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत भाजपला त्यांच्या बालेकिल्यातच दोन्ही कॉंग्रेसने धोबीपछाड दिला आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तळेगाव दाभाडे तसेच लोणावळा नगरपालिका अशा सर्वच निवडणुकांत अंतर्गत गटबाजीमुळे सपाटून मार खाल्लेल्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत पुन्हा उचल खाल्ली. त्यामुळे या पक्षाला आगामी विधानसभेला या नांदीने बळ मिळाले आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्त्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
वडगाव नगरपंचायत निकालानंतर `राष्ट्रवादी'च्या आशा पल्लवित 

मावळः नवनिर्मित वडगाव कातवी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत भाजपला त्यांच्या बालेकिल्यातच दोन्ही कॉंग्रेसने धोबीपछाड दिला आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तळेगाव दाभाडे तसेच लोणावळा नगरपालिका अशा सर्वच निवडणुकांत अंतर्गत गटबाजीमुळे सपाटून मार खाल्लेल्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत पुन्हा उचल खाल्ली. त्यामुळे या पक्षाला आगामी विधानसभेला या नांदीने बळ मिळाले आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्त्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडगाव कातवी नगरपंचायतीच्या स्थापनेपूर्वी ग्रुप ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता होती. नगरपंचायत स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत ती शुक्रवारी गेली. भाजप,बंडखोरांनी स्थापिलेली श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रणीत वडगाव कातवी नगर विकास समिती अशी तिरंगी लढत झाली. चिन्हापेक्षा समर्थक नगरसेवकांचा विचार केला तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रणीत वडगाव कातवी नगर विकास समिती सरस ठरली आहे.त्याहीपुढे जाऊन समर्थक नगरसेवकांची संख्या पाहिली तर राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसतो आहे. अपक्षांपैकी एक राष्ट्रवादी समर्थक आहे. नगराध्यक्षपद थेट असल्यामुळे सत्तास्थापनेचा दावा केवळ सोपस्कार उरला आहे. तरी,उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीने एक अपक्ष आणि एक मनसे सदस्य बरोबर घेतल्यास हे पदही भाजपला मिळणार नाही, असे दिसते. 

राष्ट्रवादीला गटबाजीफेम म्हणवून हिणवणाऱ्या भाजपलाच या निवडणुकीत गटबाजीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले नाही. त्यामुळे भास्करराव म्हाळसकर यांच्यासारखा निष्ठावान, जाणकार उमेदवार देऊनही बालेकिल्ल्यातील नगराध्यक्षपद त्यांच्या हातातून गेले. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत भास्कर म्हाळसकर आणि पंढरीनाथ ढोरे यांच्या मतांची एकत्र बेरीज दीडपट होते. एकंदरीत पंढरीनाथ ढोरे यांचा प्रवेश भाजपच्या पथ्यावर पडू शकला असता. मात्र गटबाजीमुळे सरळसरळ अर्धी मतविभागणी झालेली दिसते. निवडणुकीपूर्वी भाजपत आलेले पंढरीनाथ ढोरे यांचे राजकीय उपद्रवमूल्य भाजपसाठी डोकेदुखी ठरले यात शंका नाही. 

तालुका मुख्यालयाचे गाव, पंचायत समिती सभापतींचे गाव असलेल्या वडगाव मावळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ताधारी असलेल्या भाजपला प्रथम नगराध्यक्षपद राखता आले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एका गटाने श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडीकडून, तर दुसऱ्या गटाने वडगाव कातवी नगर विकास समितीकडून निवडणूक लढवली. दरम्यान पक्षनेतृत्वावर नाराजी दाखवत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले. मात्र,निवडणूक निकालावर त्याचा विशेष परिणाम झाल्याचे दिसत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीवेळी अंतर्गत गटबाजीने पोळलेले, मात्र अपक्ष म्हणून निवडून आलेले जि.प.सदस्य बाबूराव वायकर यांचे जुळवाजुळवीचे गणित राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी महत्त्वाचे ठरले. 

पक्ष वेगळा, आघाडी वेगळी,चिन्ह वेगळे आणि निवडून आल्यानंतर समर्थनही वेगळ्यालाच अशा सावळ्यागोंधळात राष्ट्रवादीने विरोधकांना गाफील ठेवून मारलेली मुसंडी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित करणारी आहे. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली गेलेली वडगाव मावळ नगरपंचायतीची निवडणूक,संत तुकाराम सह.साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंगेसकडून उमेदवारीची दावेदारी आणखी प्रबळ करणारी आहे. आमदारकीच्या हॅटट्रिकची संधी साधावयाची असल्यास आमदार बाळा भेगडे आणि भाजपने यापुढे सत्तेच्या धुंदीत गाफील राहून चालणार नाही हे मात्र या निकालाने निश्‍चित झाले आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com