pimpari-tushar-kamathe-tushar-hinge-bjp | Sarkarnama

सत्ताधारी दोन नगरसेवक तुषार बनलेत पोलिसांची आणि भाजपचीही डोकेदुखी 

उत्तम कुटे
मंगळवार, 6 मार्च 2018

खूनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात पाच महिन्यांपासून फरार असलेला पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपचा नगरसेवक तुषार हिंगे हा रविवारी (ता.4) अचानक पक्षाच्या विजयोत्सवात (त्रिपूरासह देशातील 21राज्यात भाजपची सत्ता आल्याबद्दल) अवतीर्ण झाला आणि पोलिसांच्या भुवया उंचावल्या.मात्र,त्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता अटकपूर्व जामीन घेतलेला असल्याने पोलिस त्याला अटक करू शकले नाहीत. तत्पूर्वी तो शनिवारी (ता.3) पालिकेतही स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवार ममता गायकवाड यांनी अर्ज भरतेवेळी हजेरी लावली होती. त्यावेळीही पालिका अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थितांचे लक्ष त्याने वेधून घेतले होते. 

पिंपरीः खूनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात पाच महिन्यांपासून फरार असलेला पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपचा नगरसेवक तुषार हिंगे हा रविवारी (ता.4) अचानक पक्षाच्या विजयोत्सवात (त्रिपूरासह देशातील 21राज्यात भाजपची सत्ता आल्याबद्दल) अवतीर्ण झाला आणि पोलिसांच्या भुवया उंचावल्या.मात्र,त्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता अटकपूर्व जामीन घेतलेला असल्याने पोलिस त्याला अटक करू शकले नाहीत. तत्पूर्वी तो शनिवारी (ता.3) पालिकेतही स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवार ममता गायकवाड यांनी अर्ज भरतेवेळी हजेरी लावली होती. त्यावेळीही पालिका अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थितांचे लक्ष त्याने वेधून घेतले होते. 

दरम्यान, एका तुषारला काहीसा दिलासा मिळाला असताना भाजपच्या दुसरा नगरसेवक तुषार पुन्हा अडचणीत आला आहे. तुषार कामठे असे त्याचे नाव आहे. हे दोन्ही तुषार सध्या काहीसे डोकेदुखी बनले आहेत, असे पोलिस आणि भाजपमधील सूत्रांनी सांगितले. त्यांच्यामुळे "ना भय, ना भ्रष्टाचार' ही घोषणा देणारा भाजप पिंपरी-चिंचवडमध्ये काहीसा अडचणीत आला आहे. तत्पर कारवाई दोन्ही तुषारवर करीत नसल्याचा आरोप पोलिसांना झेलावा लागतो आहे. 

पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली म्हणून एकमसिंग कोहली या जाहिरात एजन्सी मालकाने कामठेविरुद्ध शहरातील सांगवी पोलिस ठाण्यावर तक्रार दिली आहे. त्यात कोहली यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.तपास करून एफआयआर दाखल करू, असे त्यांना सांगण्यात आले आहे. मात्र, पोलिस तो नोंदवून घेण्याची शक्‍यता कमी असल्याने कोहली यांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. कामठे यानेसुद्धा कोहली याने आपल्याला आपल्या कार्यालयात येऊन धमकावले, अशी तक्रार पोलिसांत दिली आहे. त्यानुसारही अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही.

पालिका निवडणुकीच्या वेळी बनावट शैक्षणिक दस्तऐवज सादर केल्याबद्दल कामठे याच्याविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यातच याअगोदर चिटिंग ऍण्ड फोर्जरीचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला अटकही झाली होती. नंतर तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर ही नवी तक्रार त्याच्याविरुद्ध गेली आहे. 

पोलिसांच्या चुकीमुळे हिंगे याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. घटना घडल्यानंतर दहा दिवसांनी पोलिसांनी हिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. उशिरा दाखल केलेल्या गुन्ह्याची बाब हिंगे याच्या पथ्यावर पडली. हा तांत्रिक मुद्दा विचारात घेऊन न्यायालयाने 14 तारखेपर्यंत हिंगे याला हंगामी जामीन दिला आहे. त्यामुळे पोलिसाचा मुलगा असलेला तुषार पोलिसांच्या नाकावर टिच्चून पालिकेत आला. नंतर तो पक्षाच्या विजयोत्सवातही सामील झाला होता. 

गेल्या वर्षी 30 सप्टेंबरला शहरातील यमुनानगर पोलिस चौकीच्या आवारातच हिंगे व साथीदारांना गोंधळ घातल्याचा आरोप आहे. त्यावेळी हिंगेने पिस्तुलाने गोळी झाडून आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद महेश गारुळे या इस्टेट एजंटने दिली आहे. सिमेंटचा गट्टू डोक्‍यात मारल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

या घटनेबाबत निगडी पोलिसांनी दहा दिवस गुन्हाच दाखल केला नव्हता. त्यासाठी भीमछावा या संघटनेला आंदोलनही करावे लागले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. त्यात हिंगे फरार आहे. पोलिसांनी त्याला फरार दाखवून या गुन्ह्यात चार्जशीटही दाखल केलेले आहे. 
 

संबंधित लेख