pimpari three mp in one city | Sarkarnama

युतीचे खासदार तीन, पण तिघांचा श्रावण वेगळाच !

उत्तम कुटे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व करणारे दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. त्यातील मावळचे श्रीरंग बारणे हे पूर्ण शाकाहारी असल्याने त्यांचा वर्षभर श्रावणच असतो. तर, दुसरे शिरूरचे शिवाजीराव आढळराव-पाटील हे महिनाभर श्रावण पाळत नाहीत. तर, राज्यसभेवर निवडून गेलेले बारामतीकर अमर साबळे हे आता पिंपरी-चिंचवडचे निवासी झाले आहेत. त्यांचा कर्मकांडाला विरोध आहे. त्यामुळे ते श्रावणात पूजाअर्चा करीत नाहीत. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील अनुक्रमे शिवसेना व भाजपचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार व 
लक्ष्मण जगताप हे पूर्ण शाकाहारी आहेत. त्याप्रमाणेच या दोन्ही मतदारसंघाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे सुद्धा "व्हेजिटेरियन'च असल्याने या तिन्ही लोकप्रतिनिधींचा नेहमीच श्रावण असतो. शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचेच दुसरे खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील (शिरूर लोकसभा मतदारसंघ) हे सुद्धा श्रावण पाळत नाहीत.वैद्यकीय कारणामुळे (मधुमेहाचा आजार) त्यांना या महिन्यात उपवास करणे शक्‍य होत नाही. तर, शहरात राहणारे राज्यसभेचे मूळचे बारामतीकर अमर साबळे यांचा श्रावणातीलच नव्हे, तर एकूणच कर्मकाडांला विरोध आहे.त्यामुळे श्रावणात पूजा-अर्चा करण्याचा त्यांचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. त्यामुळे शहराच्या तीन खासदारांच्या श्रावणाबद्दलच्या वेगवेगळ्या भावना आहेत. 

आढळराव हे तिघांमध्ये सर्वांत ज्येष्ठ खासदार आहेत. त्यांची ही तिसरी टर्म आहे. तर, बाकीचे दोन्ही प्रथमच निवडून आलेले आहेत. आढळराव हे श्रावणी सोमवार व शनिवारी आहाराची खास काळजी घेतात. मात्र, डायबेटिसमुळे त्यांना श्रावण महिन्यात उपवास करणे शक्‍य होत नाही. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक आणि गटनेते असताना मावळमधून प्रथमच निवडून आलेले बारणे हे पूर्ण शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांचा नेहमीच श्रावण असतो. श्रावण महिन्यातील सोमवार व शनिवारी जेथे दौरा असेल,तेथील शंकराच्या मंदिरात ते आवर्जून जातात.तर, मूळचे बारामतीकर असलेले साबळे हे आता पिंपरी-चिंचवडकर झाले आहेत. कर्मकांडाला विरोध असल्याने श्रावणात ते पूजा अर्चा करीत नाहीत. 
 

संबंधित लेख