pimpari-standing-election-complicated | Sarkarnama

पिंपरीच्या `स्थायी' अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा गुंता वाढला 

उत्तम कुटे
मंगळवार, 6 मार्च 2018

बिनविरोध होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षपद निवडणुकीचा गुंता भाजपमधील फुटीनंतर आता वाढला आहे. राजकीय वातावरण शहरात तणावाचे झाल्याने या निवडणुकीत बळजबरीने मतदान होण्याची भीती विरोधी पक्षांचे उमेदवार मोरेश्‍वर भोंडवे यांनी वर्तविली. त्यामुळे या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची विनंतीवजा मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्तांकडे केली आहे. 

पिंपरीः बिनविरोध होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षपद निवडणुकीचा गुंता भाजपमधील फुटीनंतर आता वाढला आहे. राजकीय वातावरण शहरात तणावाचे झाल्याने या निवडणुकीत बळजबरीने मतदान होण्याची भीती विरोधी पक्षांचे उमेदवार मोरेश्‍वर भोंडवे यांनी वर्तविली. त्यामुळे या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची विनंतीवजा मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्तांकडे केली आहे. 

श्रीमंत पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदाची उमेदवारी प्रबळ दावेदारांऐवजी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकाला मिळाली. त्यामुळे पक्षातील जुना गट आणि आमदार महेश लांडगे यांचा गट संतप्त झाला. लांडगे गटाचे महापौर नितीन काळजे व स्थायी अध्यक्षपदाचे दावेदार आणि स्थायी समितीचे सदस्य राहुल जाधव यांनी पदाचे राजीनामे दिले. 

स्थायीचे सदस्य आणि अध्यक्षपदाचे स्पर्धक असलेले जुने भाजपाई शीतल शिंदे यांनीही राजीनामा सोपविला.यामुळे राजकीय वातावरण तणावाचे झाले आहे. अशा स्थितीत भयमुक्त मतदान होणार नाही.त्यामुळे गुप्त मतदान घ्यावे, अशी मागणी भोंडवे यांनी केली आहे. 

निवेदनाची प्रत त्यांनी पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनाही दिली आहे. तसेच गुप्त मतदान न घेतल्याने औरंगाबादचे महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक रद्दबादल ठरविल्याचा दाखलाही त्यांनी दिला आहे. 

यासंदर्भात जगताप म्हणाले, "2007 पासून स्थायी समिती सभापती तथा अध्यक्षांची निवडणूक हात वरून केली जात आहे.कायद्यात तशी तरतूदच आहे.त्यामुळे गुप्त मतदानाची मागणी मान्य करता येणार नाही.या निवडणुकीत पक्षादेश (व्हिप) चालतो. त्याचा भंग करणाऱ्याचे पद रद्द करण्याची तरतूदही आहे.''  
 

संबंधित लेख