पिंपरीच्या `स्थायी'च्या अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड 

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका ममता गायकवाड आज (बुधवारी) निवडून आल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोरेश्वर भोंडवे यांचा अकरा विरुद्ध चार अशा सात मतांनी पराभव केला.
पिंपरीच्या `स्थायी'च्या अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका ममता गायकवाड आज (बुधवारी) निवडून आल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोरेश्वर भोंडवे यांचा अकरा विरुद्ध चार अशा सात मतांनी पराभव केला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी श्रीमंत पिंपरी पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या महिलेच्या हातात राहिल्या आहेत. गायकवाड या स्थायी समितीच्या 34 व्या अध्यक्षा आहेत. 

"बोलण्यापेक्षा काम करून दाखवीन' अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी निवडून आल्यानंतर दिली. "मी रिमोटद्वारे नाही, तर स्वतःच्या मनाने कारभार करणार आहे. मला भाषण करायला आवडणार नाही, पण मी काम करून दाखवणार आहे. जुने प्रकल्प पूर्ण करताना नवे सुरू करण्याला आपले प्राधान्य राहील, असे त्या म्हणाल्या. नव्या स्थायी अध्यक्षांच्या प्रभागात पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न असल्याने पाणीपुरवठा सुधारण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गायकवाड यांचे नाव जाहीर केले, असे शहराचे कारभारी आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या पक्षात नाराजी असणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले. स्थायीसाठीही अधिक इच्छूक असल्याने गटबाजी आहे, असे वाटणे स्वाभाविक होते. पण,आता ती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौरबदलाचा निर्णयही पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगून स्थायी अध्यक्ष उमेदवारीनंतर पुन्हा आपल्यावर येऊ घातलेले बालंट त्यांनी खुबीने दूर केले. 

निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित स्थायी अध्यक्षांनी सभागृहनेते एकनाथ पवार यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. ओबीसी महिलेला सलग दुसऱ्यांदा स्थायीची संधी देऊन पक्षाने आपण ओबीसींच्या मागे असल्याचे दाखवून दिले आहे, असे पवार म्हणाले. फुले, आंबेडकरांना अभिप्रेत पक्षाचे काम आहे, असे सांगताना ते शाहूंचा उल्लेख करण्यास विसरले. तो त्यांच्याकडून राहिला की जाणीवपूर्वक त्यांनी तो टाळला, याची चर्चा नंतर उपस्थितांत काहीकाळ सुरु होती. 

ममता गायकवाड या भाजपच्या तिकिटावर प्रथमच प्रभाग क्रमांक 26 (पिंपळेनिलख, विशालनगर, धनराज पार्क, वेणूनगर) मधून पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. त्यांचे पती विनायक गायकवाड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. पालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

निवडणूक अधिकारी तथा महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी काम पाहिले. स्थायी सोळा सदस्य आहेत. त्यातील राष्ट्रवादीचे चार आहेत. ती सर्व मते त्यांच्या उमेदवाराला मिळाली. तर, भाजपचे सहा आणि अपक्षांचे एक अशी सात मते भाजप उमेदवाराला मिळाली. शिवसेना तटस्थ राहिली. तसे करून त्यांनी तुटलेली युती पिंपरीत मात्र राखली, अशी चर्चा त्यानंतर पालिका वर्तुळात होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com